पालकमंत्र्यांनी दुसऱ्यांदा कोरोनाला हरवले  

पालकमंत्र्यांनी दुसऱ्यांदा कोरोनाला हरवले  
 दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालेले राज्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर आपली तब्येत उत्तम असल्याचे सांगत ते घरी परतले आहे.
गेल्या सोमवारी पालकमंत्री शिंदे यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची पाहणी केली होती, तसेच ठाण्यातील एका कार्यक्रमाला ही त्यांनी हजेरी लावली होती. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. याचदिवशी ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक या दोन्ही शिवसेना नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. विचारे यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. तर सरनाईक यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार आहेत. शिंदे यांनी रुग्णालयातील उपचारादरम्यान जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाबत आढावा ही घेतला. तसेच शनिवारी रात्री त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यावर काही प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले आहे.

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची कोरोना चाचणी रविवारी पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या गृह विलगिकरणात आहेत. कोरोनावर मात करून लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होईन असा विश्वास व्यक्त करतानाच गेल्या काही दिवसात  संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

First Published on: January 10, 2022 5:05 PM
Exit mobile version