बोगस डिलिव्हरी बॉयचा कारनामा; नोकरीच्या पहिल्याच दिवशी सर्व वस्तू घेऊन फरार

बोगस डिलिव्हरी बॉयचा कारनामा; नोकरीच्या पहिल्याच दिवशी सर्व वस्तू घेऊन फरार

प्रातिनिधिक छायाचित्र

ग्राहकांना वस्तूची डिलिव्हरी पोहोचवणाऱ्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने पहिल्याच दिवशी कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घालून ग्राहकांच्या वस्तू घेऊन रफूचक्कर झाल्याची घटना ठाण्यातील कासारवडवली येथे उघडकिस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या डिलिव्हरी बॉयने दुसऱ्याच्या कागदपत्रावर नोकरी मिळवून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात या डिलिव्हरी बॉय विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फुच्र्यस ट्रँव्हल्स अँन्ड लजिस्टीक प्रा.लि. या कंपनीचे ठाण्यातील घोडबंदर आवळा गाव या ठिकाणी व्हेअरव्हाऊस आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय मालाड मुंबई या ठिकाणी आहे. या कंपनीने नुकतीच सुनील मंडराई नावाच्या तरुणाची डिलिव्हरी बॉय म्हणून नियुक्ती केली होती. कंपनीने इतर कर्मचाऱ्यासह सुनील मंडराईला आवळा येथील व्हेअरहाऊस येथे कामासाठी पाठवले होते. दरम्यान येथील ब्रँच मॅनेजर रतनसिंग भाटी यांनी सुनीलला कामाची माहिती देऊन अमेझॉन कंपनीच्या ग्राहकांना त्याच्या वस्तूची डिलिव्हरी पोहोचवण्याची जबाबदारी सोपवली होती. डिलिव्हरीसाठी त्याच्याकडे ५५ वस्तू प्रथम देण्यात आल्या त्याचसोबत ग्राहकांचे पत्ते, मोबाईल क्रमांक मंडराई या डिलिव्हरी बॉयला देण्यात आले. काही तासांनी सुनील मंडराई हा व्हेअरहाऊसमध्ये पुन्हा आला त्याच्याकडे ब्रँच मॅनेजर यांनी डिलिव्हरी पोहचवली का? याबाबत विचारले असता ५५ पैकी ७ ग्राहक घरी नसल्यामुळे त्यांना डिलिव्हरी पोहोचली नाही, असे त्याने सांगितले.

मॅनेजरने आणखी ९९ वस्तूंची डिलिव्हरीसाठी त्याला पाठवले असता सायंकाळी उशीर होऊन देखील सुनील मांडराई परतला नसल्यामुळे मॅनेजर रतनसिंग यांनी त्याच्यामोबाइल क्रमांकावर फोन लावला असता तो फोन उचलत नसल्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी ५५ पैकी ४८ ग्राहकांना फोन करून विचारले असता आम्हाला डिलिव्हरी मिळाली नसल्याचे त्यांनी मॅनेजरला सांगितले. रतनसिंग यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना कळवली. कंपनीने सुनील मंडराई याने नोकरीसाठी कंपनीकडे जमा केलेल्या आधारकार्डवरील त्याच्या घरचा पत्ता शोधून ठाण्यातील धर्मवीर नगर ठाणे येथे जाऊन खात्री केली असता त्यांना दुसरा धक्का बसला. त्या पत्त्यावर सुनील मंडराई नावाचा खरा व्यक्ती राहत होता. फुच्र्यस ट्रँव्हल्स अँन्ड लजिस्टीक प्रा.लि.मध्ये नोकरीला लागलेला तरुण भलताच निघाला. खऱ्या मडराई याला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आधारकराड दाखवले असता हे आधारकार्ड माझेच असून काही दिवसांपूर्वी रौनक कुमार शंकर झा या व्यक्तीने माझ्याकडून मोटारसायकल खरेदी करण्यासाठी त्याची झेरॉक्स घेतली होती. रौनक याची ओळख झोमॅटो या ठिकाणी झाली होती, अशी माहिती खऱ्या सुनील मांडराई याने कंपनीच्या व्यक्तींना दिली.

फसवणूक झाल्याचे कळताच कंपनीचे मॅनेजर रतनसिंग भाटी यांनी कासारवडवली येथे धाव घेतली सुनील मांडराई उर्फ रौनक झा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी कासारवडवली पोलसांनी गुन्हा दाखल केला असून सुनील मांडराई उर्फ रौनक झा याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First Published on: August 25, 2020 6:39 PM
Exit mobile version