डोंबिवली-ठाण्यातील अंतर होणार कमी, माणकोली पुलाचे होणार लोकार्पण

डोंबिवली-ठाण्यातील अंतर होणार कमी, माणकोली पुलाचे होणार लोकार्पण

सद्यस्थितीमध्ये डोंबिवली आणि कल्याणमधील नोकरदार वर्गाला ठाण्यात पोहोचण्यासाठी कमीत कमी तासाभराचा प्रवास करावा लागतो. पण येत्या काही दिवसांत डोंबिवलीकरांचा हा त्रास कमी होणार आहे. कारण मे महिन्यात डोंबिवली-माणकोली (Dombivali-Mankoli Bridge) पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते डोंबिवली हे अंतर २० मिनिटांत पार करता येणार आहे. ज्यामुळे खास करून नोकरदार वर्गाला याचा मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

शहरात पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी 2013 मध्ये डोंबिवली, मोठागाव ते भिंवडीतील माणकोली असा उल्हास नदीवर 1225 मीटर लांब व 27.5 मीटर रुंद पूल निर्णय घेण्यात आला होता. या पुलासाठी भूसंपादनासह इतर अडचणी उद्भवल्याने या पुलाचे भूमिपूजन होण्यासाठी 18 सप्टेंबर 2016 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

पण 2016 नंतर जरी या पुलाचे काम सुरू झाले असले तरी भूसंपादनाची प्रक्रिया अडथळा ठरली होती. डोंबिवली दिशेकडून पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी भिवंडीकडून जागा मिळत नसल्याने काम जवळपास वर्षभर रखडले होते. यामुळेच एकाच दिवशी भूमिपूजन झालेल्या दोन पुलांपैकी दुर्गाडी पुलाचे लोकार्पण फेब्रुवारी 2022 मध्ये करण्यात आले असले तरी माणकोली पुलाचे अजुनही लोकार्पण करण्यात आलेले नाही.

डोंबिवली पश्चिमेकडून बाहेर पडण्यासाठी सध्या वाहनचालकांना डोंबिवली पूर्वेकडून यावे लागते. त्यानंतर कल्याण शिळफाटामार्गे कल्याण किंवा मुंब्रा बायपास मार्गाने ये जा करावी लागत आहे. ज्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो आणि वेळेसोबतच इंधन देखील वाया जाते. त्यामुळे या डोंबिवली माणकोली पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात आलेली आहे. राजनोलीपासून सहा किमी आधी ठाण्याच्या दिशेने माणकोलीजवळ हा पूल उभारण्यात येत आहे. ज्यामुळे हा पूल नागरिकांसाठी आणि वाहनचालकांसाठी ठाणे-डोंबिवली हे अंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये गाठता येणार आहे.


हेही वाचा – डीएडचा अभ्यासक्रम बंद; शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना बीएड करणे बंधनकारक

First Published on: April 3, 2023 4:15 PM
Exit mobile version