जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्वानांची दहशत

जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्वानांची दहशत

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. त्यातच हे श्वान पिसाळल्याने ते नागरिकांना आपले लक्ष करत चावा घेत आहेत. गेल्या दहा महिन्यात तब्बल एक हजार 260 जणांना श्वान दंश झाला आहे. या आकडेवारी वरून शहरी भागप्रमाणे ग्रामीण भागात श्वानांची दहशत वाढत असल्याचे दिसत आहे. एप्रिल 2022 ते जानेवारी 2023या दहा महिन्यांच्या कालावधीत घडलेल्या या श्वान दंशाच्या घटनेत जुलै महिना सोडला तर उर्वरित नऊ महिन्यात श्वानदंशाच्या 100 हून अधिक घटना घडल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागाचे नागरीकीकरण होत असल्यामुळे जागोजागी निर्माण होणार्‍या घाणीच्या व कचर्‍याच्या साम्राज्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढीस लागली आहे. अशातच जागोजागी मोठ्या प्रमाणात उभ्या राहणार्‍या चायनीजच्या गाड्या, या गाड्यांवरील शिल्लक अन्न ते या भटक्या कुत्र्यांना टाकत असतात. यामुळे या कुत्र्यांना मांसाची सवय लागलेली असते. त्यात एखाद्यावेळेस हे अन्न न मिळाल्यामुळे ही कुत्री पिसाळून रस्त्यावरून मोटारसायकलवरून ये-जा करणार्‍याचा पाठलाग करणे, लोकांच्या अंगावर जाऊन भूंकणे, त्यातुन लोकांचे लचके तोडणे यांसारख्या घटना घडतांना दिसुन येत आहेत. त्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे त्या कालावधीत रस्त्यावरील माणसांचा वावर रोडावला होता. त्यामुळे श्वान दंश करण्याच्या घटनांमध्ये घट झाली होती. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर केल्यामुळे या रुग्णालयात केवळ कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दोन वर्षात भटक्या श्वानांनी लक्ष केलेल्या रुग्णांची संख्या शून्य इतकी नोंदवली गेली आहे.

तर, दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने हॉटेल्स, रस्त्यावरील रस्त्याच्याकडेला उभ्या राहणार्‍या खाद्यपदार्थांच्या गाड्या यांमुळे पुन्हा एकदा भटक्या श्वानांच्या संख्येत वाढ होत असून या श्वानांकडून नागरिकांना लक्ष केलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 या 10 महिन्याच्या कालावधीत 1 हजार 260 जणांना श्वाणांनी लक्ष केल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे.

महिना                चावा घेतलेल्याची संख्या
एप्रिल 2022            128
मे 2022                132
जून 2022              123
जुलै 2022              069
ऑगस्ट 2022          113
सप्टेंबर 2022           107
ऑक्टोंबर 2022       151
नोव्हेंबर 2022         121
डिसेंबर 2022         144
जानेवारी 2023        172
एकूण                   1,260

First Published on: February 15, 2023 10:51 PM
Exit mobile version