डॉ. रवींद्र शिसवे यांना महानिरीक्षकपदी बढती

डॉ. रवींद्र शिसवे यांना महानिरीक्षकपदी बढती

कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी या छोट्याश्या गावचे सुपूत्र डॉ. रवींद्र अनंता शिसवे यांची केंद्रात महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २००२ च्या तुकडीचे इंडियन पोलीस सेवा अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त पदावरील देशभरातल्या २३ अधिका-यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून डॉ रवींद्र शिसवे यांचे एकमेव नाव आहे. त्यांना केंद्रात महानिरीक्षक(आयजी) आणि सहसचिवपदी पदोन्नती देण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कल्याण तालुक्यातील आपटी गावात आनंदाचे वातावरण आहे.

उल्हास नदीच्या काठावर आपटी हे छोटे गाव वसलेले आहे. गाव तसे मागास, शिक्षणाची सोय नसल्यामुळे याच गावातील अनंता शिसवे यांनी जबरदस्त जिद्द, चिकाटी, कष्ट याच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मँनेजर पदापर्यंत पोहचले. तर पत्नी शुभांगी शिसवे म्हणजे डाॅ. रवींद्र शिसवे यांच्या मातोश्री या राजकारणातून कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाल्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डाॅक्टरांच्या मातापित्यांनी हे यश मिळवले. त्यांचे सुपूत्र डाॅ. रवींद्र शिसवे यांनी आयपीएस, आयएएसचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर ते  २००२ मध्ये ते महाराष्ट्रातून दुसरे आले. आयपीएसमध्ये निवड झालेले ते महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते.

डाॅ. रवींद्र शिसवे यांनी सांगली जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी म्हणून अशोक कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यानंतर गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग, बुलढाणा, सांगली आदी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यावर ते पुणे शहराचे सह आयुक्त म्हणून रुजू झाले कोरोनाच्या संकट काळात अत्यंत प्रभावी पणे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि  आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

First Published on: January 4, 2022 7:48 PM
Exit mobile version