चादरीऐवजी अमेरिकेला पाठवले दगड

चादरीऐवजी अमेरिकेला पाठवले दगड

भिवंडी येथील एन.एम.के. टेक्स्टाईल मिल्स आणि ग्लोब कॉटयार्न या दोन कंपनींना अमेरिकेतील शिकागो आणि कॅनडा येथील कंपनीने कॉटन बेडशीट (चादर) बनवून देण्याची ऑर्डर दिली होती. कंपनीने अनुक्रमे १ कोटी २६ लाख ९९ हजार ८०९ आणि १ कोटी १५ लाख असा एकूण २ कोटी ४१ लाख ९९ हजार ८०९ रुपयांचे तयार बेडशीट्स, सी बर्ड एजन्सी मार्फत ओम साई लॉजेस्टिक यांच्या कंटेनरमधून न्हावा-शेवा बंदरातून अमेरिकेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२० रोजी पाठविले. मात्र, अमेरिकेत या कंटेनरमध्ये बेडशीटच्या ऐवजी सिमेंट, दगडाचे वजनी ब्लॉक्स मिळाले. त्याची माहिती कंपनी चालकांना मिळाल्यावर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात मालाचा अपहार झाल्याबाबत तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी कंटेनरचे जीपीएस, कंटेनर चालकांचे मोबाईल सिडीआर या तांत्रिक बाबींचा तपास करून उत्तर प्रदेशात तब्बल १९ दिवस पाळत ठेवून चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करीत उत्तर प्रदेश आणि वसई येथे लपवून ठेवलेला सुमारे १ कोटी ९२ लाख ८७० रुपयांच्या बेडशीट जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. या गुन्ह्यातील आरोपींनी अपहार करण्यासाठी कंटेनर वसई येथे नेऊन त्यातील बेडशीट काढून तेवढ्या वजनाचे सिमेंट ब्लॉक कार्टूनमध्ये भरून तो माल भरला आणि अमेरिकेला पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली.

First Published on: January 21, 2021 6:11 AM
Exit mobile version