एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही- एकनाथ शिंदे

एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही- एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शेतकऱ्यांच्या पिकांची पावसामुळे झालेल्या नुकसानीची गुरुवारी पाहणी केली.

अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ठाणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भिवंडी शहापुर व मुरबाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. पालकमंत्र्यांनी भिवंडी तालुक्यातील कांदळी,मुरबाड तालुक्यातील शिदगाव, शहापुर तालुक्यातील वेलहोळी येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावर्षी एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकरी बांधवांना दिले.

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. यावर्षी भिवंडी तालुक्यात सुमारे १६ हजार हेकटर भातशेतीची तालुक्यात लागवड करण्यात आली होती. मात्र परतीच्या पावसाने सुमारे ८ हजारहून अधिक अधिक भात शेतीचे नुकसान झाले आहे. मुरबाड तालुक्यात १५५११ हेक्टर पैकी सुमारे १२००० हेक्टर तर शहापूर तालुक्यात १४१५५ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १२५०० हून जास्त भातशेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

तात्काळ सर्व पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकर शासकीय मदत दिली जाईल असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यातील सर्व पीकविमा धारक शेतकऱ्यांचे सूचना पत्र प्राप्त करुन विमा कंपन्यांकडे सादर करण्याचे निर्देशही शिंदे यांनी प्रशासनाला दिले. इफ्को टोकीयो कंपनीने देखील तात्काळ पाहणी करुन मदत उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी शहापूर तालुक्यांमध्ये शिरोड (उंबरमाळी) या गावच्या हद्दीमध्ये पळसपाडा येथे वीज पडून जखमी झालेल्या रुग्णांची शहापूर येथील रुग्णालयात भेट घेतली तसेच विचारपूस केली.

First Published on: October 22, 2020 7:39 PM
Exit mobile version