कचरा वर्गीकरण शेडवर अतिक्रमण विभागाची कारवाई 

कचरा वर्गीकरण शेडवर अतिक्रमण विभागाची कारवाई 
 बदलापूरच्या मॅरेथॉन नगरी गृह संकुलात नागरिकांनी उभारलेल्या कचरा वर्गीकरण शेडवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. हा शेड रस्त्यावर उभारलेला असल्याने ही कारवाई केल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेने तोडलेले शेड पुन्हा उभारून द्यावे अन्यथा उपोषण करू असा इशारा सोसायटीतील रहिवाशांनी दिला आहे. बदलापूरच्या शिरगाव परिसरातील  मॅरेथॉन गृहसंकुलात नागरिकांनी कचरा वर्गीकरण शेड उभारला होता. या शेडमध्ये गृहसंकुलातील रहिवाशी रोज कचऱ्याचे वर्गीकरण करत होते. त्यानंतर हा कचरा पालिकेच्या गाडीत टाकला जात होता. कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यानंतर भटके कुत्रे तसेच इतर पशु पक्षी यांच्या कडून कचरा पसरू नये, म्हणून या ठिकाणी नागरिकांनी शेड उभारले होते. या शेडचा गृहसंकुलातील रहिवाशांना कोणताही त्रास नव्हता. मात्र गृहसंकुलाच्या मागील बाजूला असलेल्या प्लॉट धारकाने या प्रकल्पाबाबत पालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालिकेने तातडीने कारवाई करत उभारलेले शेड तोडले.
याबाबत पालिकेनं सोसायटीतील सदस्यांना नोटीस बजावली होती. यानंतर पालिकेने कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती रहिवाशांनी पालिकेकडे केली होती. मात्र शेड वहिवाटीच्या रस्त्यावर असल्याने पालिकेने तोडक कारवाई केली. या कारवाईत शेड सह प्रकल्पातील कचऱ्याचे ड्रम सुद्धा तोडण्यात आलेत. त्यामुळे सोसायटीत कचऱ्याचे ढीग जमा होतायेत. या कारवाई बाबत नगर रचना विभागाचे विशाल सावंत यांना विचारले असता याबाबत माहिती देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले, तर नगर रचना विभागाचे अधिकारी विवेक कुमार गौतम यांना विचारले असता त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना याबाबत माहित असल्याचे सांगितले. एकंदरीत काय तर, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी टोलवाटोलवी केली. तर मुख्याधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एकीकडे पालिका कचरा वर्गीकरण करायला सांगते, तर दुसरीकडे पालिकेचा नगर रचना विभाग आणि अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते त्यामुळे रहिवाशां मधून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान एका प्लॉट धारकाच्या तक्रारीनंतर पालिकेने तातडीने कारवाई का केली? आणि कशासाठी? यामध्ये प्लॉट धारकाचे हित काय? अशाच प्रकारे शहरातील इतर अतिक्रमणावर पालिका कारवाई का करत नाही? असा प्रश्न सुद्धा रहिवाशांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आता पालिका पुन्हा शेड उभारून देणार का? हे पाहावं लागणार आहे
First Published on: March 16, 2023 10:25 PM
Exit mobile version