केडीएमसीच्या वतीने मोफत अंत्यविधीची सुविधा

केडीएमसीच्या वतीने मोफत अंत्यविधीची सुविधा
कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत अंत्यविधीची सुविधा पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी करण्यात आल्याचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. यामुळे मी कल्याणकर सामाजिक संस्थेच्या मागणीला यश आले असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालिका आयुक्तांचे आभार मानले आहेत.
 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्मशानभुमी व अंत्यविधी स्थाने महसुली खर्चा अंतर्गत रक्कम ३ कोटी व भांडवली खर्चा अंतर्गत रक्कम ४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. वाडेघर, गौरीपाडा, सापाड, संदप-भोपर व चक्कीनाका कल्याण पूर्व येथे स्मशानभूमी बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मोफत अंत्यविधी केशरी व पिवळया रेशनकार्ड धारकांच्या घरातील व्यक्तींचे निधन झाल्यास त्यांच्याकरीता अंत्यविधीची सुविधा विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचा मानस यंदाच्या अर्थंसंकल्पात पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
       दरम्यान मी कल्याणकर सामाजिक संस्थेमार्फत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमीत अंत्यसंस्कारा साठी लागणारी लाकडे महापालिके मार्फत मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती. कल्याण लोकसभेचे खासदार मा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांसोबत बोलून ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात हि तरतूद करण्यात आल्याने निकम यांनी मुख्यमंत्री, खासदार आणि आयुक्त यांचे आभार मानले आहेत.
First Published on: March 24, 2023 10:13 PM
Exit mobile version