मोफत कायदेशीर सल्ला देणार ‘धर्मवीर न्यायज्योत’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मोफत कायदेशीर सल्ला देणार ‘धर्मवीर न्यायज्योत’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणेः गरजूंना मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी धर्मवीर न्यायज्योत नावाने संस्था सुरु केली आहे. येथे एक वकील असेल. हा वकील गरजूंना मोफत कायदेशीर सल्ला देईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. ठाणे येथे ही संस्था सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संपूर्ण राज्यात हे कार्यक्रम सुरु आहेत. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, लहान मुलांच्या हदयावरील शस्त्रक्रिया, अपंगांना व्हिलचेअर वाटप, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोपरी पुलाचे काम सहा महिने आधीच पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांचे समर्थक आमदार व भाजपने शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आज त्यांना मी काही आव्हान देणार नाही. वाढदिवसानिमित्त आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो. आमची सवय आहे की, आम्ही कधी कुणाचेही वाईट बघत नाही. आमच्या पाठीत खंजीर खुपसले, पाठीत वार केले असतील तर आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही, नेहमी आमच्या शुभेच्छाा सर्वांसोबत असतात.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतरचा मुख्यमंत्री शिंदे यांचा पहिला वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त बुधवारी मध्यरात्रीपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे वगळता मुख्यमंत्री शिंदे यांना कोणीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.

First Published on: February 9, 2023 5:44 PM
Exit mobile version