मनसेच्या हळदी कुंकू कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मनसेच्या हळदी कुंकू कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ठाण्यातील जय भगवान हॉलमध्ये रविवारी आयोजित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सौभाग्यवती शर्मिला राज ठाकरे यांनी अगत्याने हजेरी लावल्याने महिलांची एकच झुंबड उडाली. या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या बहुतांश महिलांनी मास्क वापरले नव्हते.

कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. टाळेबंदीनंतर आता कुठे सर्व काही सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच कोरोना अद्याप संपलेला नाही, त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाकडून अजून मास्क लावण्याबरोबर सोशल डिस्टस्टिंग पाळण्याबाबत वारंवार सूचना केल्या जात आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण ठाणे शहर महिला सेनेच्या वतीने ठाणे येथील जय भगवान हॉलमध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सोशल डिस्टस्टिंगचे तीन तेरा वाजल्याचे पाहण्यास मिळाले. त्यातच शर्मिला ठाकरे यांना हळदी कुंकू लावण्यासाठी महिलांनी गर्दी केली.

या समारंभात ” हळदीकुंकू सुहासिनीचा, वाण घ्या रोजगाराचा” या संकल्पनेतून महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून रिटा बहुगुणा, शालिनी ठाकरे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, ठाणे महिला अध्यक्ष रोहिणी निंबाळकर, उपशहर अध्यक्ष समिशा मार्कंडे, चंचल कासले अशा तब्बल हजाराहून महिला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

First Published on: February 2, 2021 6:41 PM
Exit mobile version