हुमायून बंधाऱ्याची होणार दुरुस्ती

हुमायून बंधाऱ्याची होणार दुरुस्ती

ठाणे महानगरपालिका हद्दीतील हुमायून बंधाऱ्याची दुरूस्ती व येऊर येथील अन्य चार बंधारे तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील चेना नदीवर बंधाऱ्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला मंजूरी देण्याचा निर्णय जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी घेत, या बंधाऱ्यांच्या कामासाठी सर्वेक्षणाचे काम येत्या १५ दिवसांत पुर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

आमदार सरनाईक यांच्या विनंतीवरून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या दालनात आज एका बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका हद्दीतील हुमायून बंधाऱ्याची दुरूस्ती व येऊर येथील अन्य चार बंधारे तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील चेना नदीवर बंधारा बांधण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी  अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या बंधाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत असून या बंधाऱ्यांच्या निर्मितीनंतर संजय गांधी राष्ष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राण्याना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधासाठी नागरी वस्तीमध्ये येण्याची गरज भासणार नाही. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यासारखे प्राणी नागरी वस्तीत येतात, त्यामुळे स्वत:च्या जिवाला व नागरीकांच्या जिवाला देखील धोका निर्माण होत असतो किंवा अनेक वेळा हे बिबटे पाण्याच्या शोधासाठी रस्त्यावर आल्यामुळे भरधाव वाहनांच्या धडकेमुळे मृत्यु पावलेले आहेत. तसेच पावसाळ्यामध्ये चेना नदीतील पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे व भातशेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

त्याचबरोबर येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे स्वच्छ पाणी खाडीमध्ये जात असल्याने या बंधार्याच्या निर्मितीनंतर किमान ३ एम.एल.डी. पाणी ठाणे व मिरा-भाइर्दर शहरातील नागरीकांना मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बंधाऱ्यासाठी एकूण ७ कोटी रूपये व संरक्षण भिंतीसाठी ४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी डी.पी.सी.च्या माध्यमातून जलसंधारण विभागाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला प्रश्न निकाली काढल्याबद्दल आमदार सरनाईक यांनी जलसंधारण मंत्री गडाख यांचे आभार मानले व लवकरात लवकर या कामाला सुरूवात करण्यासंदर्भात संबंधीतांना आदेश करण्याची विनंती केली.

या बैठकीला जलसंधारण विभागाचे अवर सचिव पाटील व सहसचिव दि.शा. प्रशाळे, तसेच सुनिल काळे – प्र.ज.अ. ठाणे, मि.अ.पालवे – उपअधिकारी ठाणे,निवेदिता पाटील – सहजिल्हा नियोजन अधिकारी, ठाणे, उदय चंद्रकांत ढगे – उपसंचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, प्रवीण खेडकर – नि.वा.अ. ठाणे, जोकार डी.एम. – जिल्हा संधारण अधिकारी – लघुपाटबंधारे विभाग जि.प. ठाणे. हे उपस्थित होते.

First Published on: February 15, 2022 7:55 PM
Exit mobile version