जिल्हा नियोजन बैठकीत महत्वाचे प्रकल्प मार्गी

जिल्हा नियोजन बैठकीत महत्वाचे प्रकल्प मार्गी

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या विषयांना गती मिळाली. यात शासकीय जमिनींवरील अतिक्रमण काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थानिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने रेल्वे प्रशासन आणि पालिकांमध्ये बैठक आयोजित करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याप्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रकरणाची माहिती मिळताच यापूर्वीच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला होता. तर नावाळी येथील आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्न पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निकाली काढण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीची बैठक नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार १८ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील आणि कल्याण लोकसभा मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने अनेक वर्षांपासून मोबदल्याप्रकरणी प्रलंबित असलेला नावाळी येथील आरोग्य केंद्राची जागा नवी मुंबई महापालिकेच्या ताब्यात असून ही जागा जिल्हा परिषद, ठाणे यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

जिल्हा परिषद, ठाणे यांच्या अखत्यारीत असलेल्या १४ गावांसाठी नावाळी मधील आरोग्य केंद्र उभारण्याकरिता जागा आवश्यक आहे.  जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे पुन्हा ही मागणी करण्यात आली. त्यावर त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत नवी मुंबईच्या ताब्यात असलेला राखीव भूखंड हा जिल्हा परिषद ठाणे यांना आरोग्य केंद्र उभारण्याकरता देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांकडून घेण्यात आला.

कळवा, कल्याण (पूर्व) आणि डोंबिवली येथील रहिवाशांना रेल्वेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून तातडीने घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. याविषयी श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली.  त्यानंतर खासदारांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशीही दूरध्वनीवर चर्चा केली. संबंधित विषय जिल्हा नियोजन बैठकीतही मांडण्यात आला. यावेळी रेल्वे प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांची संयुक्त  बैठकीचे आयोजन तातडीचे करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना दिल्या.

या सोबतच कल्याण लोकसभा मतदार संघातील अंबरनाथ व कल्याण तालुक्यात आदर्श शाळा तयार करण्याकरिता जिल्हा नियोजनच्या माध्यमातून १० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचेकडे केली आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व तिसगाव येथील १०० फुटी रोडलगत  आरक्षित भूखंडावर रुग्णालय आणि क्रीडासंकुल उभारण्यासाठी पालिकेने महासभेत मंजुरी दिली होती. मात्र अधिग्रहणाचे काम पूर्ण झालेले नाही. यातील लाभार्थ्यांना टीडीआरचा मोबदला तसेच संबंधित प्रकल्पांसाठीचा निधी तातडीने उपलब्ध करण्याचे खासदार शिंदे यांनी सुचवले. त्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

First Published on: January 19, 2022 8:47 PM
Exit mobile version