रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठीच्या बालस्नेही बसचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठीच्या बालस्नेही बसचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

रस्त्यावर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून महिला व बालविकास विभागाने सुरु केलेल्या फिरत्या पथकाच्या राज्यातील पहिल्या बालस्नेही बसचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या हस्ते मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात  आले.

जिल्ह्यातील रस्त्यांवर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना शिक्षण व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत फिरत्या पथकाचा प्रकल्प केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी देऊन ५० लाखांचा निधीही दिला. हा प्रकल्प राज्यातील ठाणे जिल्ह्यासह पुणे, नाशिक, मुंबई शहर व उपनगर तसेच नागपूर या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या पथकासाठी बालस्नेही बस देण्यात येणार असून राज्यातील या पहिल्या बसचे उद्घाटन आज ठाण्यात झाले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी आदी उपस्थित होते. या बसमधील मुलांना आहार व शैक्षणिक मदत देण्यात येणार आहे.

असा आहे प्रकल्प
एका बसमध्ये २५ मुलांची सोय, ठाणे जिल्ह्यातील सहा ठिकाणी बस फिरणार, बसमध्ये एक समुपदेशक, शिक्षक-शिक्षिका, वाहनचालक आणि काळजी वाहक असे चार कर्मचारी असणार आहेत, स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच बसमध्ये सीसीटीव्ही व ट्रॅकिंग सिस्टीम असणार आहे.

First Published on: February 21, 2023 10:01 PM
Exit mobile version