पायाभूत विकास, वने यांची सांगड घालणे काळाची गरज – आयुक्त डॉ. विपिन शर्मा

पायाभूत विकास, वने यांची सांगड घालणे काळाची गरज – आयुक्त डॉ. विपिन शर्मा

बदलत्या जीवनशैलीमुळे जंगलतोड असून पायाभूत विकास करत असताना विकास व वने यांची सांगड घालणे काळाची गरज असल्याचे मत प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी व्यक्त केले. ठाणे महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ उपक्रमांतर्गत ‘जागतिक वन दिनानिमित्त महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने जागतिक वन दिनानिमित्त सोमवारी ”जंगले आणि शाश्वत उत्पादन, वापर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.

रोजच्या जीवनात शुध्द हवा, पिण्याचे पाणी तसेच मूलभूत बाबी जंगलांमुळेच मिळतात, मात्र बदलत्या जीवनशैलीसाठी केल्या जाणाऱ्या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. सद्यस्थितीत जंगले वाचविणे काळाची गरज असून ती वाचवण्याची संकल्पना आज पुढे येत आहे. त्याअनुषंगाने हरित क्षेत्र वाढविले पाहिजे, यासोबतच स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यावर भर दिला पाहिजे असे मत महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी व्यक्त केले.
यावेळी या कार्यशाळेमध्ये हरियाली या सामाजिक संस्थेचे तज्ञ सदस्य प्रदिप लोथे यांनी वृक्ष लागवडीबाबत व मे. टेराकॉन या संस्थेचे तज्ञ सदस्य डॉ. निनाद राऊत यांनी वृक्ष गणना व हरित क्षेत्राबाबत तसेच ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या सिनियर सायंटीस्ट विद्या सावंत यांनी जैवविविधता रजिस्टर बाबत सादरीकरण केले.

First Published on: March 21, 2022 8:51 PM
Exit mobile version