मोदी, शाह नेपाळमार्गे युरोपला पळतील, म्हणणारेच त्यांच्याकडे पळाले- जितेंद्र आव्हाड

मोदी, शाह नेपाळमार्गे युरोपला पळतील, म्हणणारेच त्यांच्याकडे पळाले- जितेंद्र आव्हाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह नेपाळमार्गे युरोपला पळतील, असे गणेश नाईक राष्ट्रवादीत असताना म्हणायचे. पण गणेश नाईकच त्यांच्याकडे पळाले. शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता. पण नाईक यांनी त्यांना धोका दिला. बाळासाहेब ठाकरे यांचाही त्यांनी अशाचप्रकारे विश्वासघात केला होता, अशा शब्दात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी गणेश नाईक आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

APMC उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव

रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी गणेश नाईक आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीत असताना गणेश नाईकांना मान होता, पण भाजपच्या कार्यक्रमात बसायला खुर्चीही मिळत नाही’ अशा शब्दता नाईकांची खिल्ली देखील जितेंद्र आव्हाड यांनी उडविली. भाजपमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात कुस्ती आहे. मंदा म्हात्रे या आपल्याच आहेत. गणेश नाईक आपल्यातून गेले. पण बहीण आपलीच आहे, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे. मग आपले शेतकरी कुठे जातील? ज्या सहकार चळवळीने महाराष्ट्राला मोठे केले त्याच सहकार क्षेत्रात भाजपने घोळ घातल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

नवी मुंबईत नगरेसवकांची यादी पाहिली तर महाविकासआघाडी भक्कम आहे. या निवडणुकीत धनशक्तीचा वापर केला जाईल. पण आपण जनशक्तीच्या बळावर निवडून येऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे नवी मुंबई प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. भाजपवाले सतत सरकार पडेल अशी चर्चा घडवून आणतात. मात्र, आमचे संजय राऊत त्यांना पुरून उरतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेदेखील खंबीर आहेत. तेव्हा आता नवी मुंबईतील धनशक्ती मोडून काढायची, असा निर्धार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

त्याची पुनरावृत्ती महाविकास आघाडी करणार?

भाजप नेते गणेश नाईक यांची २० वर्षांपासूनचीनवी मुंबई महापालिकेतील सत्ता उलथून लावण्यासाठी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीने रविवारी वाशी येथील विष्णुदार भावे नाट्यगृहात मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेस नेते अस्लम शेख, आनंद परांजपे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक,शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी आदी नेते या मेळाव्यात उपस्थित आहेत. या निमित्ताने विजय नाहटा यांची पर्यावरण प्राधिकरणाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने अस्लम शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर महाविकास आघाडीचा नवी मुंबईतील हा पहिलाच मेळावा आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. आता नवी मुंबई महापालिकेतही त्याची पुनरावृत्ती महाविकास आघाडी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First Published on: January 17, 2021 4:26 PM
Exit mobile version