बेकायदेशीर रेती उपसावर करडी नजर

बेकायदेशीर रेती उपसावर करडी नजर

गेली अनेक महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी, कल्याण आदी खाडी किनारी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या रेती उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवत कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात केलेल्या कारवाई करीत १९ सक्शन पंप, १६ बार्जसह रेती हौदांवर कारवाई केली. त्यामध्ये सव्वाचार कोटींचा मुद्देमाल नष्ट करून दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती जिल्हा रेतीगट विभागाने दिली.

ठाणे, कल्याण आणि भिवंडी खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या रेती उपसा सुरु असल्याबाबात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेतीबंदर, कोन, कशेळी काल्हेर, कोपर ते मोठागाव ठाकुर्ली रेती बंदर, पारसिक रेतीबंदर, कल्याण रेती बंदर, कशेळी खादिपात्र, मोडक सागर धरण, उल्हास नदी खाडी पात्र आदी विविध ठिकाणी जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्याच्या कालावधीत ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर आदी तहसीलदार विभागाच्या माध्यमातून बेकायदेशीर रेती उपसावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईत १९ सक्शन पंप, १६ बार्ज, ५७ ब्रास रेती नष्ट- जप्त करण्यात आली. तर, ६८ रेती हैद व कुंड्या नष्ट करण्यात आल्या. दोन क्रेन, दोन इंजिन यासह सात बोटी असा ४ कोटी २५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा रेती गट विभागाने दिली.

First Published on: May 15, 2023 7:55 PM
Exit mobile version