कंत्राटी कामगारांचा ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर अर्धनग्नावस्थेत मोर्चा

कंत्राटी कामगारांचा ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर अर्धनग्नावस्थेत मोर्चा

हे वर्ष सुरू झाल्यापासून पगार अदा न केल्याने त्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्या थकीत पगारासह बोनस आदी मागण्यासाठी बुधवारी सी पी तलाव येथील कंत्राटी कामगारांना अर्धनग्न अवस्थेत ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. याप्रसंगी कामगारांनी महापालिका प्रशासनाचा निषेध करीत घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत, संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी आणि थकीत वेतन तत्काळ अदा करावे अशी मागणी केली.

कचरा वाहतूकीच्या कामासाठी पालिकेने मे. मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. या कंपनीची नेमणूक केली असून २०१७ पासून ही कंपनी हे काम करीत आहे. हे काम १० वर्षाकरिता या कंपनीला देण्यात आले आहे. या ठेकेदारामार्फत सी.पी. तलाव येथे सुमारे ६१ कामगार काम करीत असून त्यात वाहन चालक, वाहन चालक सहाय्यक, सफाई कामगार आणि मेंटेनन्स कामगार यांचा समावेश आहे. या ठेकेदारावर प्रशासनाच्या संबंधीत विभागाचा अंकुश नसल्यामुळे त्याने गेल्यावर्षी दिवाळीत कामगारांना बोनस दिला नाही. तीन महिन्याचे वेतन अद्याप दिले नाही.

ठेकेदाराच्या या आडमुठ्या धोरणामुळे या कामगारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती म्युनिसिपल लेबर युनीयनचे सरचिटणीस बिरपाल भाल आणि चिटणीस चेतन आंबोणकर यांनी दिली. तसेच मागील ३ वर्षात भरपगारी सुट्टीची रक्कम अद्यापही अदा करण्यात आलेली नाही. हेल्पर पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामगारांप्रमाणे देय असलेले किमान वेतन अदा केले जात नसून केवळ १० हजार रूपये वेतन अदा केले जात आहे.

कामगार कायद्यानुसार ठेकेदार जर कायदेशीर देणी व इतर कायदेशीर सोयी सुविधा कामगारांना पुरवत नसेल तर मूळ मालक म्हणून ही जबाबदारी ठाणे महापालिका प्रशासनाची आहे, असेही ते म्हणाले. गुढीपाडव्यापर्यंत थकीत वेतन आणि बोनसची रक्कम अदा करण्याचे निर्देश संबंधीत कंत्राटदारास द्यावेत तसेच प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत या कामगारांना त्यांचे वेतन, त्यांची सर्व कायदेशीर देणी आणि सेवासुविधा देण्याची सूचना संबंधीतांना करावी, अशी मागणी कामगारांनी यावेळी केली.

First Published on: March 23, 2022 9:49 PM
Exit mobile version