वीजबिलाच्या शून्य थकबाकीसाठी प्राधान्य देण्याची गरज

वीजबिलाच्या शून्य थकबाकीसाठी प्राधान्य देण्याची गरज
महावितरणच्या कोंकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी भांडूप परिमंडलातील अभियंत्यांची आढावा बैठक महावितरण भांडूप परिमंडल कार्यालयात घेतली. या बैठकीत भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता  सुरेश गणेशकर यांच्या सोबत तिन्ही मंडलाचे अधीक्षक अभियंते, अरविंद बुलबुले, राजाराम माने, इब्राहीम मुलाणी आणि भांडूप परिमंडळचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण रहांगदळे उपस्थित होते. तसेच तिन्ही मंडलाचे कार्यकारी अभियंता, तसेच वरिष्ठ व्यवस्थापक व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.
मुख्य अभियंता भांडूप परिमंडळाचे सुरेश गणेशकर यांनी यावेळी कामाचे संगणकीय सादरीकरण केले.  तसेच सुरु असलेल्या वीजचोरी मोहीम व इतर कामाबाबत माहिती दिली. यावेळी, कोंकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी अभियंत्यांना प्रत्येक दिवस प्रभावीपणे काम करून आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यास सांगितले. त्यांनी, थकबाकीची वसुली, ग्राहकांची अचूक बिलिंग, स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक सेवा विभागांकडे असलेली वीजबिलांची थकबाकी तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश सर्व अभियंत्यांना दिले.
प्रत्येक अभियंत्याने वेग-वेगळ्या संकल्पनेतून शून्य थकबाकी करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न केले पाहिजेत. वीज जोडणी खंडित करण्यापूर्वी, थकबाकी असलेल्या ग्राहकांच्या आवारात वीज जोडणी खंडित करण्याची सूचना काटेकोरपणे चिकटवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच बिलिंग हा आपल्या कामातला एक महत्वाचा घटक असून अचूक बिलिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे, योग्य प्रयत्न करून तसेच दर महिन्याला मीटर रीडिंग एजन्सी बैठक घेऊन स्थानिक अभियंत्यांनी आढावा घ्यावा. एजन्सीच्या कामात गैरप्रकार आढळल्यास एफआयआर दाखल करावा. याशिवाय, शहरातील सर्व भागांमध्ये जमिनीवर खुले केबल दिसत असून हे केबल्स व्यवस्थितपणे ‘मेथड ऑफ कंस्ट्रक्शन’ प्रमाणे केबल टाकाव्यात, अशा विविध समस्येवर तातडीने दुरुस्तीचे काम करावेत अन्यथा काही गैरप्रकार झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर निश्चित केली जाईल, त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी सूचना सहव्यवस्थापकीय संचालक  प्रसाद रेशमे यांनी अभियंत्यांना यावेळी दिली.
मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी, तात्पुरता वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची २० कोटी  व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची ४० कोटी थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी वसूल करण्याची तसेच सर्व सूचनांवर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ग्वाही कोंकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांना दिली.
First Published on: February 4, 2022 8:27 PM
Exit mobile version