गावदेवी मंडईच्या ५०० मिटर परिसरात नो पार्किंग झोन

गावदेवी मंडईच्या ५०० मिटर परिसरात नो पार्किंग झोन

नौपाडा आणि स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गावदेवी भाजी मंडई भागातील ५०० मिटरपर्यंतचे रस्ते नो पार्किंग झोन करण्याचा तसेच तीन हात नाका ते मल्हार सिनेमा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गावदेवी भागातील रिक्षा चालकांच्या अरेरावीला लगाम बसणार आहे. ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने मंगळवारी ठाणे महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, व्यापारी आणि काही जागरूक नागरिक यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे झाली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमन करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.

वाहतुकीचे नियमन करताना ठाणेकरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आ. केळकर यांनी बैठकीत दिल्या. गावदेवी परिसरात बेशिस्तपणे रिक्षाचालक रिक्षा उभ्या करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ती दूर करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर या परिसरातील रस्ते ५०० मीटरपर्यंत नो पार्किंगची झोन करण्यात येणार आहे.
या भागात येणाऱ्या दुचाकी गाड्यांसाठी गावदेवी येथील पार्किंगची व्यवस्था खुली करावी, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड महिन्याचा कालावधी जाणार असल्याने महापालिका प्रशासनाने ही पे अँड पार्किंग योजना स्वतः राबवण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

त्याचबरोबर प्रायोगिक तत्त्वावर मल्हार सिनेमा ते तीन हात नाका हा रस्ता एकेरी करण्यात येणार असून तीन हात नाक्यावरून हरिनिवास सर्कल टेलिफोन एक्सचेंज येथून गोखले रोडला जाता येणार आहे. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर तो कायम ठेवण्यात येणार असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले. शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी वाहतूक नियमन करण्यासाठी काही प्रयोग सुरू केले आहेत. त्याचा ठाणेकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आ. केळकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीला वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड, महापालिका उपायुक्त जे. जे. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, परिवहन सदस्य विकास पाटील, व्यापारी अध्यक्ष मितेश शाह, विनय नाईक, शैलेश भावे आदी उपस्थित होते.

First Published on: May 9, 2023 10:08 PM
Exit mobile version