दिव्यात पाण्याच्या टँकरखाली सापडून तरुणाचा मृत्यू; मनसे, भाजप आक्रमक

दिव्यात पाण्याच्या टँकरखाली सापडून तरुणाचा मृत्यू; मनसे, भाजप आक्रमक
ठाणे – आगासन गावातून दिवा येथे जात असताना पाण्याच्या टँकरखाली सापडून एका बावीस वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार खाली पडला, दरम्यान समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. गणेश विठ्ठल फले असे या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा – ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रा; परिवहन मंडळ आणि महापालिकेकडून विशेष सुविधा
गणेश हा आगासन फाट्यावरून सोमवारी रात्री दिव्यात येत असताना त्याच्या टिव्हीऐस या दुचाकीचा ताबा सुटल्याने तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. समोरून भरधाव वेगाने आलेल्या पाण्याचा टँकर त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांसाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत मनसेचे आमदार प्रमोद (राजू)पाटील यांनी ट्विटर वरून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्यावर कर्मचारी व मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या संदर्भात या घटनेची मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा मेलचा ‘तो’ आवाज बंद न झाल्यास रेल्वेरुळावर उतरून आंदोलन करू, डॉ जितेंद्र आव्हाड पुन्हा आक्रमक

मनसे आक्रमक

या अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली. मृत तरुणाच्या कुटुंबीयांना १० लाखांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मनसेने केली आहे. तर, या अपघाताला जबाबदार असलेले महानगर पालिकेचे संबंधित अधिकारी अनिल पाटील यांना तात्काळ निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवा प्रभाग समिती, सहाय्यक आयुक्क्त त्याच्या दालनाबाहेर आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.
उदासीन प्रशासन, निगरगट्ट स्थानिक माजी सत्ताधारी

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर दिवा आगासन या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर प्रशासन आणि माजी सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे, हलगर्जीपणामुळे परत एकदा एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेले कित्येक वर्षे वारंवार पाठपुरावा करूनही या रस्त्याच्या डागडुजीकडे अजिबात लक्ष दिले गेले नाही. आज रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे एका बाईकस्वार युवकाला ट्रकखाली अपघात होऊन जागीच जीव गमवावा लागला. याआधीही असे बळी गेले आहेत. उदासीन प्रशासन, निगरगट्ट स्थानिक माजी सत्ताधाऱ्यांना या मृत्यूला जबाबदार समजून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावी, अशी मागणी दिवा भाजपकडून करण्यात आली आहे.

First Published on: August 29, 2022 4:31 PM
Exit mobile version