ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रा; परिवहन मंडळ आणि महापालिकेकडून विशेष सुविधा

वय वर्षे 60 पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या औचित्याने गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. यासाठी ठाणे परिवहन महामंडळाने वातानुकूलित बसेस, ठाणे महापालिकेने आरोग्यसेवक, तर राज्याच्या पर्यटन विभागाने गाईड व अल्पोपहार अशा सुविधा देण्याचे ठरविले आहे.

ठाणे: गणेशोत्स्व आता एवढ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. विश्वातील सर्वात मोठा गणेशोत्सव सोहळा महाराष्ट्र राज्यात साजरा होतो. महाराष्ट्र राज्याचा पर्यटन विभाग व ठाणे महापालिका आणि ठाणे परिवहन महामंडळाने संयुक्तपणे ठाणे महानगरांतील वय वर्षे 60 पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या औचित्याने गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे.

हे ही वाचा – ठाण्यातील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी साक्षात विघ्नहर्त्याचेच आवाहन!

महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा समजला जातो. या निमित्ताने ठाण्यातील गणेशोत्सव मंडळं आपापल्या परिसरात नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम इत्यादी माध्यमातून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करतात. कोरोना महामारीदरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यावर देखील स्वाभाविक मर्यादा आल्या होत्या. परंतु दोन वर्षांनंतर प्रथमच राज्यभरात मोठ्या उत्साहात व निर्बंधरहित वातावरणात गणेशोत्सवाचे आयोजन होणार आहे. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असतानाच ज्येष्ठ नागरिकांना शहरातील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची यात्रा घडविली जाईल. यासाठी ठाणे परिवहन महामंडळाने वातानुकूलित बसेस, ठाणे महापालिकेने आरोग्यसेवक, तर राज्याच्या पर्यटन विभागाने गाईड व अल्पोपहार अशा सुविधा देण्याचे ठरविले आहे. तसेच सर्व मंडळात श्री गणपती दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाईल. 1,2,5,6 व 7 सप्टेंबर 2022 या पाच दिवसांत या यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा –  खरा वारसा कोण चालवतंय? जनता निवडणुकीतून दाखवेल, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

या योजनेचा जास्तीत जास्त लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा व गणेशोत्सवाच्या मंगलकाळात श्री गणपती दर्शन घ्यावे, असे आवाहन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे. या सहलीसाठी प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य या तत्वावर निवड करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी रु. 75 चा ऑनलाईन भरणा केल्यास सहलीत सहभागी होता येणार आहे. www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची असून अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन महासंचालनालयाचे प्रशांत 9029581601 किंवा कल्याणी 7030780802 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा पर्यटन संचालनालय कोकणविभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले आहे.

हे ही वाचा –  ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी देण्याचा वेग वाढला, मंडळांची संख्याही वाढली

 

Edited By – Nidhi Pednekar