मोहने येथे उल्हास नदी प्रदूषित

मोहने येथे उल्हास नदी प्रदूषित

मोहने येथील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता उल्हास नदीत सोडले जाते. त्यामुळे कल्याणकर सामाजिक संस्थेच्या वतीने बुधवारपासून नदीत तराफा बांधून बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे. प्रदूषणामुळे नदीत मोठ्या प्रमाणात विषारी जलपर्णी निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न येथे ऐरणीवर आला आहे.

उल्हास नदीमुळे चार ते पाच ठिकाणाहून सार्वजनिक नाल्यांमधून कुठलीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीच्या प्रवाहात सोडले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील किमान 45 लाख नागरिकांना पिण्यासाठी या नदीतील पाणी पुरवठा केले जाते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे बरोबरच ठाणे मीरा-भाईंदर भिवंडी उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ इत्यादी ठिकाणी उल्हास नदीच्या पाणी पुरवठा केले जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका या पाण्यावर प्रक्रिया न करता उघडपणे नदीत सोडले जात असल्याने नदी पूर्णपणे दूषित झाली आहे. नदीत जलपर्णी पाण्याचे अतिरिक्त शोषण करीत असून यामुळे छोटे मोठे मासे देखील मृत पावत आहेत. या पाण्यामुळे नागरिक आजारी पडत असल्याचा आरोप धरणे आंदोलनास बसलेल्या आंदोलकांनी केला आहे. माजी नगरसेवक नितीन निकम, कैलास शिंदे , उमेश बोरगावकर यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

प्रशासनातर्फे बंधारा, टाकी बांधकाम सुरू
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मलःनिस्सारण विभागाच्या वतीने केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मोहोने नाला येथे बंधारा, उदंचन केंद्र बांधले जात आहे. हे सांडपाणी आंबिवली मलशुद्धीकरण केंद्र येथे नेण्याचे काम चालू असल्याचे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून सांगण्यात आले. यासंदर्भात मी कल्याणकर सामाजिक संस्थेला उल्हास नदी बचाव समिती वालधुनी बिरादरी, द वॉटर फाउंडेशन आणि अन्य सामाजिक संस्थेने आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे पालिका आयुक्त, ठाणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, विरोधी पक्षनेते तसेच अन्य शासकीय कार्यालयांना निवेदनाची प्रत देण्यात आल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

 

 

First Published on: February 10, 2021 7:15 PM
Exit mobile version