हळदी समारंभातच साधला डाव

हळदी समारंभातच साधला डाव

प्रातिनिधिक फोटो

कल्याणच्या सापर्डे गावात हळदी समारंभाच्या ठिकाणी झालेल्या एका महिलेची हत्या आणि दोन जण जखमी झाल्याच्या घटनेने सापर्डे गावात खळबळ उडवून दिली होती. मात्र महिलेची हत्या करून स्वतःसह एका महिलेला जखमी करून दरोड्याच्या बनाव रचणाऱ्या जखमीचा डाव खडकपाडा पोलिसांनी हाणून पाडत जखमी इसमावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात रविवारी रात्री हळदी समारंभ सुरु होता. त्यावेळी शेजारच्याच घरात एका दोन महिला आणि पुरुषावर शस्त्राने हल्ला करण्यात आला असून तिघेही गंभीर जखमी झाले असल्याची माहिती हळदीच्या ठिकाणी समजली. त्यानंतर गावकऱ्यानी या ठिकाणी धाव घेऊन जखमी सुवर्णा चिंतामण घोडे (३६), भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना गावक-यांनी ताबडतोब उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करून खडकपाडा पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली असता सुवर्णा हिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. पोलिसांनी सुवर्णा या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन मुंबईतील जे.जे रुग्णालयात विच्छेदनासाठी नेला.

पोलिसांनी जखमी पवन म्हात्रे याचा जबाब नोंदवला असता काही चोरटे चोरीच्या उद्देशाने घरात घुसले आणि त्यांनी आमच्यावर शस्त्राने हल्ला पोबारा केला. अशी माहिती पवन याने पोलिसांना दिली. मात्र घटनास्थळी पोलिसांना चोरीचा कुठलाही पुरावा मिळून आला नसल्यामुळे पवन हा खोटे बोलत असावा असा संशय पोलिसांना आला. परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त पोवार आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरु करून २४ तासांच्या आतच या घटनेतील सत्यता उघडकीस आणली. पवन याने दरोड्याचा बनाव रचून सुवर्णा या महिलेची हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुवर्णा ही आरोपीच्या कुटुंबात सतत दखल देत असल्याचे पवनला आवडत नव्हते, तसेच त्याला तिचा संशय देखील येत होता, तिला कायमची अद्दल घडवायची योजना पवन याने आखली होती. दरम्यान रविवारी घराजवळच हळदी समारंभ सुरु असताना पवन याने सुवर्णाला या समारंभातून घरी बोलावून घेतले आणि शस्त्राने तिची हत्या करून स्वतः आणि भारती म्हात्रे हिच्यावर वार करून दरोड्याचा बनाव रचला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. दरम्यान पोलिसांच्या उलट तपासणीत पवन याने गुन्ह्याची कबुली दिली असून अखेर सोमवारी सायंकाळी उशिरा खडकपाडा पोलिसांकडून पवन म्हात्रे याच्याविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

First Published on: February 22, 2021 9:23 PM
Exit mobile version