अंबरनाथ तालुक्यात पावसाळी पर्यटनावर निर्बंध

अंबरनाथ तालुक्यात पावसाळी पर्यटनावर निर्बंध

Barvi Dam

बदलापूर शहरात पावसाळी पिकनिकसाठी ठाणे आणि मुंबईतील अनेक निसर्गप्रेमी येतात. कोंडेश्वर, बारवी डॅम परिसरात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. पावसाळ्यात होणार्‍या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ तालुक्यात पर्यटनस्थळी मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोंडेश्वर, बारवी डॅम परिसरात पर्यटकांना बंदी असणार आहे. चार जुलैपासून 31 ऑगस्ट पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार बदलापूरच्या कोंडेश्वर परिसरातील धामनवाडी, तारवाडी, भोज, वर्‍हाडे, दहिवली मळीचीवाडी हा परिसर व चांदप गावचे हद्दीत बारबी डॅम परीसरात बारवी नदी, पिंपळोली, आस्नोली, सागाव ते बारवी डॅम गेट नंबर ३ येथील 3 कि.मीच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असणार आहेत. तसेच या परिसराच्या तीन किमी हद्दीत दुचाकी, चारचाकी वा सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध असणार आहे.

स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी याबाबत पत्र दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. धबधब्याचा परिसर आणि नदीकिनारी मद्यपान करणे किंवा मद्य सेवन करून प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्या जागेवर मद्य सेवन करणे. या सोबतच धबधबे, दर्‍याचे बंदरे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे, कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बादल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, डि.जे.अश्या कृत्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

वर्षापर्यटनात अनेक पर्यटकांचा मृत्यू
बारवी डॅम परीसरात पर्यटक पोहण्यासाठी येत असतात. पाण्याचा अंदाज न आल्याने या ठिकाणी पाण्यात बुडुन मृत्यु झालेले आहेत. धबधब्यावरती फिरण्यास आलेले पर्यटक मद्यपान केल्याने त्यांचा तोल जावून पाण्यात बुडुन मयत होण्याच्या घटना देखील या ठिकाणी घडल्या आहेत. या ठिकाणी गेल्या दहा वर्षात सुमारे 50 ते 60 नागरिकांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे.

First Published on: July 8, 2022 9:43 PM
Exit mobile version