मातीच्या भरावामुळे पुराचा धोका

मातीच्या भरावामुळे पुराचा धोका

पूरपरिस्थिती क्षेत्र (प्रातिनिधिक फोटो)

सेंच्युरी रेऑन कंपनीच्या बिट्स स्कुल आँफ मॅनेजमेंटकडून करण्यात आलेल्या शेकडो ब्रास मातीच्या भरावामुळे कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पावशेपाडा गावास पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे. येथील ग्रामस्थांनी कल्याण उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन येत्या मंगळवारी म्हणजे 16 मे 2023 रोजी दु तीन वाजता कल्याण उपविभागीय तथा उपविभागीय दंडाधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी सुनावणी ठेवली आहे. गाव वाचवण्यासाठी यावेळी शेकडो ग्रामस्थ या सुनावणीस उपस्थितीत राहणार असल्याचे माझी पोलीस पाटील संजय भोईर यांनी सांगितले. कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत पावशेपाडा हे गाव उल्हास नदीच्या काठावर वसले आहे. 26जुलै2005च्या महापुरात या गावाला जबर पुराचा फटका बसला होता. तसा प्रत्येक वर्षी बसतोच, पण आजूबाजूचा संपूर्ण परिसर मोकळा असल्याने पाणी जास्त काळ राहत नव्हते.परंतु आता परिस्थिती खूपच वेगळी झाली आहे. नदीच्या त्या बाजूला मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. बांध घातले आहेत, मोहना, मोहिली या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. इकडे म्हारळ, वरप कांबा येथेही नदीकानारे हाऊसफुल्ल झाले आहेत.

अशातच पावशेपाडा येथे शेकडो एकर जागेत मोठ्या प्रमाणावर दगड, माती,विटा, मुरुम याची भरणी केली आहे. प्रत्यक्षात 100ब्रास माती उत्खननाची परवानगी असताना कित्येक ब्रास भरणी केली आहे. यामुळे यावर्षी पावशेपाडा गावास पुराच्या पाण्याचा अधिक धोका निर्माण झाला आहे. गावास जलसमाधी मिळते की काय? अशी भिती लोकांना वाटत आहे. त्यामुळे गावातील माझी सरपंच अरुण तुर्भेकर, पोलीस पाटील, संजय भोईर, चंद्रकांत भगत,शिरिष भगत, किशोर पावशे आदी शेकडो ग्रामस्थांनी गाव वाचवण्यासाठी बिट्स स्कुल ऑफ मॅनेजमेन्ट विरोधात जिल्हाधिकारी ठाणे, प्रांताधिकारी, कल्याण, तहसीलदार कल्याण यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. अखेरीस कल्याण प्रांताधिकारी अभिजीत भांडे पाटील यांना सत्य परिस्थिती व निर्माण होणारी आपत्ती, याविषयी सांगितल्यानंतर त्यांनी सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स स्कुल ऑफ मॅनेजमेन्टच्या व्यवस्थाकांना नोटीस बजावून पावशेपाडा ग्रामस्थ आणि मॅनेजमेंट यांची सुनावणी येत्या मंगळवारी 16मे 2023रोजी दुपारी तीन वाजता कार्यालयात ठेवली आहे. यावेळी आपले म्हणणे मांडण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले आहे. त्यामुळे पावशेपाडा ग्रामस्थ देखील गाव पुराच्या धोक्यापासून वाचविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे माझी सरपंच अरुण तुर्भेकर, माझी पोलीस पाटील, संजय भोईर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भगत, शिरिष भगत, प्रल्हाद भगत, राजेश पावशे, किशोर पावशे आदी ग्रामस्थांनी सांगितले.

First Published on: May 12, 2023 9:27 PM
Exit mobile version