बेघर तुपे कुटुंबाला निवासाचे छत्र !

बेघर तुपे कुटुंबाला निवासाचे छत्र !

तब्बल ५० वर्षांपासून अशक्यप्राय वाटणारे तुपे कुटुंबियांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. कर्तव्यदक्षपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा ही सच्च्या माणसाची तीन ‘आयुधे’ तुपे कुटुंबाला घर मिळवून दिली. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी बिल्डर कुणाल गाला यांच्याकडे पाठपुरावा करून, बेघर कुटुंबाला स्वप्नातील निवारा प्रत्यक्षात मिळवून दिला. तुपे कुटुंबाला आता हक्काचे घर मिळाले आहे.

पाचपाखाडी येथील आनंद सावली गृहसंकुल म्हणजे आदर्श झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प ठरला. त्यात सुमारे ५०० हून अधिक कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळालं. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करीत गृहसंकुल साकारण्यात माजी ज्येष्ठ नगरसेवक पवार यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे. आता पवार यांच्याच प्रयत्नाने एका बेघर कुटुंबाला घरही मिळाले. लक्ष्मी आणि शंकर शिवाजी तुपे हे बेघर कुटुंब. आसरा मिळेल, तेथे राहायचे. जोरदार पावसाच्या सरी असो की उन्हाळ्यातील असह्य उष्मा. तुपे कुटुंबांची निवार्‍यासाठी भटकंती सुरूच होती. तरुण वय सरलं, वृद्धापकाळ आला. पण डोक्यावर निवारा मिळालाच नाही.

आनंद सावलीच्या जागेवरील झोपडपट्टीतील एका ठिकाणी ते राहत असत. इमारती बांधण्यासाठी झोपड्या तोडल्या. पण एका कोपर्‍यातील पडक्या झोपडीत तुपे कुटुंब दिवस ढकलत होते. आनंद सावली संकुलाचे काम रखडले होते. त्यावेळी त्यांनी या जागेवर कोणतेही अतिक्रमण होऊ नये, बांधकामाचे साहित्य चोरीला जाऊ नये, म्हणून काळजी घेतली. अन्, प्रत्यक्षात संकुल उभे राहण्यासाठी खारीचा वाटा उचलला.

आनंद सावली प्रकल्पात अनेक कुटुंबांचे घर झाले, असेच तुपे कुटुंबांचेही घर व्हावे, अशी पवार यांच्याबरोबरच अनेक रहिवाशांची भावना होती. त्यातून त्यांनी बिल्डर कुणाल गाला यांच्याकडे प्रयत्न सुरू केले. गाला यांनीही मानवतावादी दृष्टीकोनातून तुपे कुटुंबांला घर देण्याचे कबूल केले होते. आनंद सावलीत रहिवाशी स्थिरावत असतानाच तुपे कुटुंबियांची फरपट सुरूच होती. त्यांच्या घरासाठी पवार यांनी पाठपुरावा सुरू केला. अन्, आज तुपे कुटुंबियांसाठी ॠसोन्याचा दिवस’ उजाडला. त्यांचे स्वप्नातील घर आज साकार झाले. पवार यांच्याच हस्ते तुपे कुटुंबियांना घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. अन्, मानवतेचा एक नवा आदर्श निर्माण झाला

First Published on: March 25, 2022 9:17 PM
Exit mobile version