शिंदे मळा परिसरात सांडपाण्याने दुर्गंधी

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २१ फडके मैदान येथील शिंदे मळा परिसरातील रहिवासी काही वर्षांपासून दुर्गंधीने त्रासलेले आहेत. या भागात नाल्यातील सांडपाणी, शौचालयातील घाण वाहून रस्त्यावर येत आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे.

नागरिकांच्या या समस्येकडे पालिका प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर नागरिकांच्या या समस्येवर वेळेत उपाययोजना न केल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक शाखाध्यक्ष महेश बनकर यांनी दिला आहे.कल्याण पश्चिमेतील लाल चौकी नजीक असलेल्या शिंदे मळा परिसरात शेकडो कुटुंब चाळीमध्ये राहत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी आणि शौचालयातील मलबा वाहून नेणारी मलवाहिनी फुटल्याने हे दोन्ही पाणी एकत्र होऊन गटाराद्वारे बाहेर वाहत आहे. तसेच हे पाणी नागरिकांच्या मोरीत देखील शिरत असल्याने नागरिकांच्या घरात आणि परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गटारावाटे हे पाणी नागरिकांच्या घरात येत असल्याने येथील रहिवाशांचा त्रास वाढला आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात देखील हे सांडपाणी पसरले असल्याने ये जा करताना नागरिकांना नाक मुठीत धरावे लागत आहे.

परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींशी, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांन सांगून ही समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. येथे मलवाहिनी दुरुस्तीसाठी २०१९ मध्ये १० लाखांचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र अद्याप हे काम करण्यात आले नाही. याबाबत येथील रहिवाशांनी येथील मनसे शाखाध्यक्ष महेश बनकर यांना सांगितले असता. त्यांनी याठिकाणची पाहणी करत या समस्येबाबत पालिका आयुक्त आणि संबंधित विभागाला पत्र दिले. पत्र देऊन ८ दिवस उलटून देखील पालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिले नसल्याने वेळेत ही समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत मादगुंडी यांनी सांगितले की, या कामासाठी प्रस्ताव मंजूर असून प्रशासकीय कामे होताच येथील काम करण्यात येणार आहे.

First Published on: February 11, 2021 9:23 PM
Exit mobile version