भाजपच्या दुसऱ्या दिवा मंडळ अध्यक्षाने बांधले शिवबंधन

भाजपच्या दुसऱ्या दिवा मंडळ अध्यक्षाने बांधले शिवबंधन

भाजपच्या दुसऱ्या दिवा मंडळ अध्यक्षाला अवघ्या १५ दिवसात पळविण्यात शिवसेनेला यश आले. मंगळवारी दिवा मंडळ अध्यक्ष नीलेश पाटील आणि त्यांची पत्नी अर्चना पाटील यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
तत्कालीन भाजप दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत यांनी स्व आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भगत सेनेत जाणार असल्याची कुणकुण लागल्याने एक दिवस आदी भाजप जिल्हाध्यक्षक तथा आमदार निरंजन डावखरे यांनी नीलेश पाटील यांची दिवा मंडळ अध्यक्ष पदी निवड करून त्यांना नियुक्ती पत्रही एक छोटा कार्यक्रम घेऊन दिले होते. मात्र त्याला १५ दिवस होत नाहीतोच दिव्यात भाजपला धक्का देण्यात शिवसेनेला यश आले आहे. मंगळवारी दिवा मंडल अध्यक्ष निलेश पाटील हे शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. नीलेश पाटील यांच्यावर देखील एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. निवडणुकीत याच मुद्यावरुन शिवसेनेकडून पाटील यांच्यावर भिती दाखविली जात होती. तसे झाले तर निवडणुक लढता येणार नसल्याने पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

” दिव्यात अनेक समस्या आहेत, गेल्या काही वर्षांपासून येथील विकास खुंटला आहे. त्यामुळे दिव्याच्या विकासासाठीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.”- नीलेश पाटील

” दिव्यात शिवसेनेची पायाखालची वाळू सरकली असून त्यांचा त्यांच्याच नगरसेवकांवर विश्वास नाही, त्यामुळेच ते भाजपचे पदाधिकारी आपल्यासोबत घेत आहेत. निलेश पाटील यांना पक्षाने देखील संधी दिली होती. आता ते त्याचे दुर्भाग्य असेच म्हणावे लागणार आहे.”
– निरंजन डावखरे – शहर अध्यक्ष, भाजप – ठाणे

” सध्या भाजपमधून शिवसेनेत सुरू असलेला पक्षप्रवेश ही राजकीय आत्महत्या आहे. त्यांनी पक्षामध्ये प्रामाणिक कामे केली नसल्याने त्यांच्यावर दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची वेळ आली आहे. तर, त्यांच्या सोबत कोणतेही पदाधिकारी गेलेले नसून पदाधिकारी पक्षासोबत एकनिष्ठ आणि ठाम आहेत. ”
– रोहिदास मुंडे, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, भाजप

 

First Published on: February 15, 2022 7:34 PM
Exit mobile version