अंध-दिव्यांग बांधवांसोबत शिवसेनेचा अनोखा दिवाळसण!

अंध-दिव्यांग बांधवांसोबत शिवसेनेचा अनोखा दिवाळसण!

दिवाळीचा सगळीकडेच उत्साह असला, तरी ज्यांच्या डोळ्यांना दिव्यांची रोषणाई दिसते, त्यांच्यासाठी हा उत्साह आनंद देणारा ठरतो. मात्र, ज्यांच्या डोळ्यांना दिव्यांची रोषणाई दिसत नाही, त्यांच्यासाठी हा आनंद कायम पारखा राहतो. मात्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सामाजिक जाणिवेच्या भावनेतून २ अंध भगिनींना दिलेला शब्द पाळला आणि ही दिवाळी अशाच अंध-दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली. श्रीकांत शिंदे यांनी २ अंध भगिनींना आर्थिक मदत करतानाच त्यांच्या २ नवजात मुलींना चंदेरी पैंजनांची अनोखी भेट देखील दिली. त्यामुळे त्यांच्यासाठी ही दिवाळी विशेष ठरली आहे!

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून वांगणी येथील ४५० अंध बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने रेशन, दिवाळीचं संपूर्ण साहित्य आणि फराळाचं वाटप करण्यात आलं.

टाळेबंदीत अंध बांधवांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब विविध प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर शिवसेनेने त्यांना थेट आर्थिक मदत तसेच किराणा साहित्य उपलब्ध करून दिले होते. सोबतच, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सर्व अंध बांधवांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली होती. आता त्यांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेनं पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.

First Published on: November 15, 2020 10:52 PM
Exit mobile version