धक्कादायक! उल्हासनगरमधील महिला डॉक्टरच करत होती नवजात बाळाची विक्री

धक्कादायक! उल्हासनगरमधील महिला डॉक्टरच करत होती नवजात बाळाची विक्री

डॉक्टर हा एक असा पेशा आहे जिथे रुग्ण डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवत असतात, पण अनेकदा अशा काही घटना घडतात की ज्यामुळे या डॉक्टरावर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. अशीच डॉक्टरकी पेशाला काळीमा फासणारी घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. उल्हासनगरमधील एका महिला डॉक्टरने नवजात बाळांची खरेदी-विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर तीनच्या कंवरराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होम मधील महिला डॉक्टर टोळीच्या माध्यमातून असा प्रकार करत असल्याचे उघडकीस आली आहे. (Shocking! A woman doctor in Ulhasnagar was selling newborn babies)

हेही वाचा – हुर्रर्र… बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च मान्यता; फडणवीस – कोल्हेंनी केले स्वागत

मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी नर्सिंग होम मधील महिला डॉक्टर टोळीच्या साहाय्याने नवजात बाळांची खरेदी-विक्री करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सानिया हिंदुजा आणि सोनू पंजाबी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी नकली ग्राहकांच्या माध्यमातून या प्रकरणाचा छडा लावला. या घटनेत नाशिकहून आलेल्या एका महिलेच्या 22 दिवसाच्या बाळाला सात लाख रुपयांत खरेदी करण्याचा व्यवहार झाला होता. त्यानुसार, एका डमी ग्राहकाला हे बाळ विकत असताना ठाणे क्राईम ब्रांत आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिला डॉक्टरला रंगेहाथ पकडले.

या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिला डॉक्टरने मुलांचे आणि मुलींचे रेट कार्ड देखील ठरवले होते. त्यानुसारच 22 दिवसांच्या बाळाची सात लाख रुपयांना विक्री होणार होती. या घटनेत राज्यातील आणि राज्याच्या बाहेरची टोळी देखील सक्रीय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाईला सुरूवात केली आहे. सध्या महिला बालकल्याण विभाग आणि क्राईम ब्रँच अधिकारी या सगळ्या घटनेची चौकशी करत असून लवकरच एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

परंतु, शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेलं हे रॅकेट कोणाच्या लक्षात कसे नाही आले. सदर महिला आरोपी डॉक्टरसह आणखी किती जण या प्रकरणात दोषी आहेत, याबाबतचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

First Published on: May 18, 2023 2:19 PM
Exit mobile version