महासभेत स्थायी समिती सभापतींनी सादर केला ३२४६.३२ कोटींचा अर्थसंकल्प

महासभेत स्थायी समिती सभापतींनी सादर केला ३२४६.३२ कोटींचा अर्थसंकल्प

 एकीकडे महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी  फुगलेल्या अर्थसंकल्पाची कोरोनामुळे हवा काढून २ हजार ७५५ कोटी ३१ लाखांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर केला होता. पण, स्थायी समितीने त्यामध्ये ४९१ कोटींची वाढ सुचवली आहे. त्यामुळे ठामपा मूळ अंदाजपत्रक हा ३२४६.३२ कोटींचा झाला असून तो अर्थसंकल्प मंगळवारी अर्थसंकल्पावरील विशेष महासभेत स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी ठाणे महापालिका सर्वसाधारण सभेसमोर सादर केला आहे. अर्थसंकल्पात सुचवलेल्या वाढीत  शहर विकास विभाग ३१३ कोटी असून मालमत्ता करात १०० कोटी, जाहीरात फी १७.६३ कोटी, सार्वजनिक बांधकाम १० कोटी, तर पाणी पुरवठा आकारात २५ व इतर ६ कोटी ३७ लाख अशी एकूण ४९१ कोटींची वाढ प्रस्तावित केली आहे.

    ५ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी स्थायी समितीत २०२०-२१ चे २ हजार ८०७ कोटींचे सुधारित तर २०२१-२२ चे २ हजार ७५५ कोटीं ३२ लाखांचा ठामपाचा मूळ अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर स्थायी समितीत त्यावर १५ दिवस जोरदार चर्चा करुन त्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी सर्व विभागांशी चर्चा केल्यानंतर २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११० कोटी ९३ लाखांची वाढ केल्याने तो अर्थसंकल्प २ हजार ९१७ कोटी ९६ लाखांवर गेला. तसेच मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ केल्याने हा अर्थसंकल्प ३ हजार २४६ कोटी ३२ लाखांवर गेला आहे.

   त्यातच कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न कमालीने घटले असल्याने मूळ अर्थसंकल्पात प्रशासनाच्या वतीने १३०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामुळे जे प्रकल्प सुरु आहेत त्या प्रकल्पांना देखील ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती. याशिवाय नगरसेवकांना देखील प्रभागात कामे करणे कठीण झाले होते. यासाठी मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ करण्यात आली असल्याची माहिती सभापती संजय भोईर यांनी दिली आहे. उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता करामध्ये १०० कोटी, जाहिरात फी मध्ये १७ कोटी ६३ लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाककडून  १० कोटी, स्थावर मालमत्ता भाड्यापोटी १९ कोटी, शहर विकास विभागाकडून ३१३ कोटी, पाणी पुरवठा विभागाकडून २५ कोटी इतर विभागाकडून ६ कोटी ३७ लाख असे ४९१ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

 भांडवली खर्चामध्ये प्रमुख बाबींसाठी वाढ
क्लस्टर संक्रमण शिबिर बांधण्यासाठी नव्याने १५ कोटी ७५ लाख, रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटकरणासाठी वाढीव ३४ कोटी १० लाखासह एकूण ६४ कोटी १० लाखांची तरतूद, युटीडब्ल्युटी पध्दतीने रस्ते नुतणीकरणासाठी वाढीव २९ कोटी ४० लाखासह ५९ कोटी ४० लाखांची तरतूद, विकास आराखडय़ातील रस्ते बांधणीसाठी १३८ कोटी, नाले बांधणीसाठी १६ कोटी ६५ लाख वाढीव तरतूदीसह ४१ कोटी ६५ लाख तरतूद, प्रभागात मलवाहिन्या टाकणे व हाऊस कनेक्शन यासाठी २० कोटी तरतूद होती, त्यात २१ कोटींची वाढीव तरतूद, अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असल्याने यात २० कोटी वाढ करुन ६० कोटींची तरतूद, कौसा रुग्णालयाच्या वाढीव कामासाठी २९ कोटी, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाण्यासाठी धरण गरजेचे असल्याने त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. परंतु त्यासाठी तरतूद मात्र करण्यात आली नाही. रायलादेवी तलाव परिसर विकासासाठी वाढीव १६ कोटी ४० लाखांसह १८ कोटींची तरतूद, बाळकुम येथे कलरकेम कंपनीमध्ये सुविधा भुखंडावर तसेच मनोरमा नगर येथे दवाखान्यासाठी आरक्षित भुखंडावर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्याचे प्रस्तावित आहे.

 प्रभाग क्रमांक २८ मध्ये अद्यायावत रुग्णालय व आरोग्य केंद्र उभारणे या कामांसाठी २८ कोटींची वाढीव तरतूद, मांसुदा तलाव सुशोभिकरणासाठी वाढीव  ७ कोटी ५० लाख, थीम पार्क विकसित करण्यासाठी वाढीव १० कोटी २० लाख, ढोकाळी येथील शरदचंद्र पवार स्टेडीअम खेळांडूच्या वास्तव्यासाठी तळ अधिक दोन मजल्यांची इमारत प्रस्तावित करुन त्यासाठी ५ कोटी, विद्युत संयत्रे स्थलांतरीत करणे १७ कोटी, बाळकुम येथील तरण तलावाच्या ठिकाणी देखील राहण्यासाठी वसतीगृह इमारत उभारण्यासाठी ८ कोटी, दादोजी कोंडदेव क्रिडागृहात हायमास्ट बसविण्यासाठी १२ कोटी, कळवा रुग्णालय नुतणीकरण व नवीन इमारत बांधणीसाठी २ कोटी ५० लाख, खिडाकाळी तलाव व शिवमंदिर परिसर सुशोभिकरणासाठी ५ कोटी, लोकप्रतिनिधींच्या प्रभागातील तातडीची व अत्यावश्यक कामे करण्यासाठी प्रती सदस्य २८ लाख ८२ हजार प्रमाणे नगरसेवक स्वेच्छा निधी अशा प्रकारे भांडवली खर्चात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

महत्वाचे मुद्दे
दुसरीकडे तर उत्पन्न वाढीसाठी ढाबे, लॉन्स, ओपन स्पेस, रस्त्यावरील पार्कीग यांच्यावर कर आकारणी करण्याची सुचना त्यांनी केली आहे. जाहीरात फलक लावतांना ज्याची मंजुरी मिळाली त्याच आकाराचा जाहीरात फलक लावण्यात यावा, तर कोरोनामुळे बांधकाम व्यावसायिकांना फटका बसला असेल तरी ही परिस्थिती सुधारणार असल्याने शहर विकास विभागाकडून देखील अपेक्षा वाढविण्यात आल्या आहेत. तर परिवहन सेवेसाठी ३५ कोटींची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. चरांचे पुनपृष्ठीकरण करतांना प्रभाग समितीनिहाय ज्या प्रभाग समितीमधील चरांच्या पुनपृष्टीकरणासाठी रस्ता फोड फी जमा झाली आहे त्या प्रभाग समितीसाठी त्या प्रमाणात निधी देण्यात यावा, रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी अंदाजखर्च तयार करतांना त्यामध्ये पाणी पुरवठा, विद्युत व मलनिसारण या विभागाकडील कामांचा समावेश करुन रस्ते बांधकामांचा एकत्रित अंदाजखर्च तयार करावा, महापालिकांच्या शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे त्या शाळा प्रथम टप्यात डिजीटल कराव्यात, शाळा दुरुस्तीसाठी १६ कोटी, बालवाडय़ा दुरुस्तीसाठी ३ कोटी प्रस्तावित, तर नवीन शाळा बांधकामांसाठी १३ कोटी ७१ लाखांची तरतूद प्रस्तावित, महिला बालकल्याण कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित तरतूद कमी केली होती. ती आता पुन्हा २५ कोटी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी १७ कोटी तरतूद प्रस्तावित, महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र कक्ष तयार करुन खोली ती च्यासाठी ही संकल्पना राबविण्यासाठी ७५ लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

First Published on: March 23, 2021 10:05 PM
Exit mobile version