डोंबिवलीत खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण

डोंबिवलीत खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण

अवघ्या चार दिवसांच्या पावसामुळे डोंबिवली शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची पुरती चाळण व्हायला सुरुवात झाली. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याची कामे केली जातात. एव्हढेच नव्हे तर पावसाळ्यात पडलेले खड्डे खडी टाकून भरण्यात येतात. मात्र यंदा विहित वेळेत या कामाचे टेंडरच काढण्यात आले नसल्याने खड्डे भरण्याची कामे होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नेमेची येतो पावसाळा त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीत पावसाळ्याच्या दिवसात नेमेची पडतात खड्डे अशीच रस्त्यांची अवस्था कायम आहे. सालाबादप्रमाणे दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. तसेच दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मे अखेर जूनमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यांवर पडलेले खड्डे भरून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येते. घाईघाईत रस्त्यांची दुरुस्ती केलेल्या कामाचा दर्जा राखला जात नाही. त्यामुळे गुळगुळीत आणि चकाचक केलेले रस्ते पावसाळ्यात अगदी महिनाभरात उखडतात. हा दरवर्षीचा कल्याण डोंबिवलीकरांचा अनुभव आहे. मात्र यंदा पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवर पडलेले खड्डे भरून रस्ते दुरुस्तीची कामेच करण्यात आलीच नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा 1 जुलै पासून पावसाने खर्‍या अर्थाने सुरुवात केली. मात्र अवघ्या 4 ते 5 दिवसांच्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली. पावसाने उसंत न घेतल्याने पावसाळ्यात त्या खड्ड्यांमध्ये खडी, माती आणि मुरूम टाकून खड्डे भरण्याची कामे करण्याची गरज आहे. मात्र पावसाळ्यात पडलेले खड्डे खडी मुरूम टाकून भरण्याच्या कामाचे देखील टेंडर काढण्यात आले नाही. वास्तविक मार्च अखेरीस पावसाळ्या पूर्वी करावयाची अत्यावश्यक कामे, पावसाळ्यात करावयाची अत्यावश्यक कामे यांची निविदा प्रक्रिया सुरु होते. एप्रिल अखेर वा मे च्या सुरुवातीला टेंडर मंजूर होवून कामाला सुरुवात होत असते. मात्र यंदा विलंबाने जूनमध्ये टेंडर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यात अडचणी येत आहेत.

गतवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी खर्च केलेले तब्बल 15 कोटी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते. यंदा खड्डे भरण्याचे टेंडरच अजून मंजूर झालेले नसल्याने खड्डेच खड्डे चहूकडे अशीच परिस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी यांच्याशी संपर्क साधला असता होवू शकला नाही.

First Published on: July 6, 2022 6:49 PM
Exit mobile version