अमर टॉवर दुर्घटनेचा धडा, ठामपाने वेळीच जागे व्हावे!

अमर टॉवर दुर्घटनेचा धडा, ठामपाने वेळीच जागे व्हावे!

येथील भास्कर कॉलनीमधील २५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन रहिवासी जखमी झाले आहेत. अनधिकृत इमारतीने ठामपाला शिकविलेला हा धडा असून प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अन्यथा येत्या पावसाळ्यात आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. भास्कर कॉलनी येथील सात मजली अमर टॉवर ही अनधिकृत इमारत २५ वर्षे जुनी असून आज सोमवारी पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून तीन रहिवासी जखमी झाले. जखमी रहिवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना केळकर म्हणाले की ही दुर्घटना म्हणजे ठाणे महापालिकेला धडा असून प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अन्यथा येत्या पावसाळ्यात अशा दुर्घटनांमधून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

शहरात सध्या अनधिकृत इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून याची माहिती सहाय्यक आयुक्त आणि वॉर्ड अधिकाऱ्यांनाही आहे. मात्र प्रती चौरस फुटाने पैसे घेऊन अशा बांधकामांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. गेल्या दोन वर्षात कियी इमारती झाल्या आणि सध्या सुरू असलेल्या अनधिकृत इमारतींचा पावसाळ्याआधीच सर्वेक्षण करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला.
प्रभागात सर्वसामान्यांनी चार विटा जरी रचल्या तरी अधिकारी त्यांच्या दारात जाऊन उभे राहतात, पण आठ  दहा मजली इमारती अनधिकृतपणे उभ्या राहत असताना त्याकडे दुर्लक्ष करतात. अनधिकृत इमारतींबाबत अधिकाऱ्यांना केवळ नोटीसा बजावण्यात येऊ नयेत तर सहायक आयुक्तांना यात जबाबदार धरून कठोर कारवाई करण्यात यावी, तरच अनधिकृत इमारतींना आळा बसेल, असा सल्लाही केळकर यांनी दिला.

First Published on: May 15, 2023 8:01 PM
Exit mobile version