अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल

अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल

डोंबिवलीत विविध सोयी सुविधांसाठी केडीएमसीने आरक्षित केलेल्या राखीव भूखंडावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभारण्याचे करण्याचे सत्र सुरूच आहे. आता तर डोंबिवलीत आरक्षित असलेल्या जमिनींवर भूमाफियाची नजर गेली असून गेल्या वर्षभरात उद्यानासाठी आरक्षित असलेल्या अर्धा डझन जागा गिळंकृत झाल्या आहेत. तेथे बेकायदा इमारतींचे टॉवर्स उभे राहिले असल्याचे वृत्त 21 एप्रिल रोजी महानगरने प्रसिद्ध केले.त्या वृत्ताची डोंबिवलीतील आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी दखल घेत येत्या 10 दिवसात केडीएमसीने कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

डोंबिवली शहरात छोटी छोटी 8 ते 10 उद्याने आहेत. मात्र केडीएमसीला डोंबिवलीत एकही मोठे उद्यान विकसित करता आले नाही. डोंबिवली शहरात उद्यानासाठी अनेक आरक्षित जागा होत्या. मात्र आता त्या भूखंडावरच अनधिकृत बांधकाम सम्राट असलेल्या भूमाफियांची नजर गेली आहे.शहरातील उद्यानासाठी राखीव असलेल्या अर्धा डझन भूखंडावर बिनदिक्तपणे अतिक्रमण करून सात मजली बेकायदा इमारतींचे टॉवर्स उभारले गेले आहेत. डोंबिवली पूर्वेत मानपाडा रोडवर गावदेवी मंदिरा शेजारी असलेल्या गजबंधन पाथर्ली नाना नानी पार्कच्या उर्वरित जागेवर बेकायदा इमारतीच्या टॉवर्सचे काम सुरु आहे.याप्रकरणी अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या, मात्र केडीएमसी प्रशासन त्यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. सर्वात म्हत्वाचे म्हणजे एकही राजकीय पक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेवक, आमदार,खासदार आदी लोकप्रतिनिधी देखील याबाबत तोंडातून एक चकार शब्द काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

डोंबिवलीत गेल्या वर्षभरात अर्धा डझन उद्यानासाठी राखीव असलेल्या जागा भूमाफियांनी गिळंकृत केल्याचे वृत्त महानगरने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल 65 इमारतींची रेरा नोंदणी घोटाळा उघडकीस आणणारे आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी घेतली. मौजे गजबंधन पाथर्ली,मानपाडा रोडवरील बगीचा आरक्षण क्रमांक 93 या उद्यानासाठी राखीव असलेल्या आरक्षित जागेवर सात मजली बेकायदा इमारत उभी राहिली.त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदारांनी मुद्दा उपस्थित केला होता.तरीही या इमारतीवर कोणतीही कारवाई होत नसल्याने आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना पत्र पाठवून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तातडीने उद्यानाच्या जागेवर उभ्या राहिलेल्या त्या इमारतीवर येत्या 10 दिवसात कारवाई करण्याची मागणी केली. तसे न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा थेट इशारा दिला होता. त्यानुसार पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सुट्टी काळात देखील न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली.

First Published on: May 4, 2023 10:31 PM
Exit mobile version