गाफील न राहता परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे – निरंजन डावखरे

गाफील न राहता परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे – निरंजन डावखरे

गाफील न राहता परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे - निरंजन डावखरे

पार्किंग प्लाझा हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्णांना तातडीने हलविण्याची घटना गंभीर आहे. सध्या आपत्तीच्या काळात सत्ताधारी व महापालिकेने गांभीर्याने परिस्थिती हाताळावी. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे. ठाणे महापालिकेने पार्किंग प्लाझा येथे उभारलेल्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याचा प्रकार धक्कादायक होता. अशा प्रकारांमुळे रुग्ण व नातेवाईकांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. सध्या ठाण्यातील रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. कालच्या घटनेनंतर यापुढे सत्ताधारी व महापालिका प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने हाताळावी. कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण काहीसे निर्धास्त झालो. मात्र, दुसऱ्या लाटेमुळे गंभीर संकट निर्माण झाले. त्यातच पार्किंग प्लाझातील परिस्थितीमुळे हॉस्पिटलची व्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र निर्माण झाले.

 

शहरात बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिविरचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी व महापालिका प्रशासनाने संयम व जबाबदारीने परिस्थिती हाताळावी. व्हेंटिलेटर, रेमडेसिविर किंवा ऑक्सिजनअभावी रुग्णाचा जीव जाऊ शकतो, याचे भान ठेवावे. त्याचबरोबर कोविड आपत्तीत `टाळूवरील लोणी’ खाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे व्हेंटिलेटर खरेदी लाच प्रकरणातून उघडकीस आले. त्यामुळे सत्ताधारी व महापालिकेने सतर्कता बाळगावी, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.

 

कोविड आपत्तीत लोकसहभागाबरोबरच सर्वपक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींचे सहकार्य व मदत घेण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यातून संशयित रुग्णांची टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन वेगाने होण्याबरोबरच कोरोना साखळी मोडण्यास मदत होऊन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला दूर करता येईल, असा विश्वास आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला आहे.

 

First Published on: April 11, 2021 7:04 PM
Exit mobile version