अर्थसंकल्पीय चर्चेत अपशब्दांची बरसात

महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना, झालेल्या धक्काबुक्कीचा प्रकार ताजा असतानाच, कै.अरविंद पेंडसे सभागृहात शुक्रवारी सदस्यांनी एकमेकांवर अपशब्दांची बरसात केली. त्यातच काँग्रेसच्या एका नगरसेवकाची सत्ताधारी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकावर खुर्ची फेकुन मारण्यापर्यंत मजल पोहोचली. याचदरम्यान भाजपच्या एका नगरसेवकाने वेळीच प्रसंगावधान राखत महाविकास आघाडीतील सेना आणि काँग्रेस नगरसेवकांमधील हा वाद मिटवला. त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला. त्यातच या असभ्य वर्तनामुळे सभागृहातील महिला सदस्यही गोंधळून गेल्या. त्यानंतर, अर्थसंकल्पीय चर्चा थांबवण्यात आली. ती चर्चा पुढील आठवड्यावर ढकलण्यात आली आहे. यामुळे त्या सभागृहाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी ठामपा मुख्यालयातील स्थायी समितीच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात महापालिका आयुक्तांनी सादर केला. त्यावेळी सभागृहात सदस्यांनी गोंधळ घालता होता. त्यातच काँग्रेस आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्की चा प्रकार घडला होता. तर अर्थसंकल्पावर गुरुवारपासून सभागृहात चर्चा सुरु आली. चर्चेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पुन्हा ही चर्चा पुढे सुरू झाली. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सुरळीतपणे सुरु असलेल्या चर्चेत अचानक अपशब्दांचा वापर सुरू झाला. त्यातच काँग्रेस सदस्य विक्रांत चव्हाण हे वारंवार सभागृहात ये-जा करीत होते. तर बोलण्याची संधी मिळताच वर्ष २०१८,१९ आणि २० च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास सुरू केली. परंतु जुने विषय का उगाळता आताच्या बजेटवर चर्चा करा, अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी करताच आक्रमक झालेल्या काँग्रेस नगरसेवक मला जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे मला काय बोलायचे, हे शिकवू नये असा शाब्दीक टोला लगावला आणि येथूनच शिवसेना आणि काँग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली.

सभागृहात महिला सदस्य आणि पालिकेच्या महिला अधिकारी सभागृहात असल्याचे भान विसरुन एकमेकांना अपशब्द देण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. त्यातच काँग्रेसचे नगरसेवक चव्हाण यांनी शिवसेनेचे नगरसेवक मणेरा यांच्यावर थेट खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपच्या सदस्य कृष्णा पाटील यांनी काँग्रेसच्या सदस्याच्या हातातील खुर्ची खेचून घेतली आणि त्याला बाहेर नेल्यानंतर तो वाद मिटला आणि त्या दोन्ही सदस्यांनी एकमेकांची माफी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

First Published on: February 12, 2021 8:21 PM
Exit mobile version