आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकाम

आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकाम

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहर विकास आराखड्यातील कल्याण पूर्वेतील बगीच्यासाठी असलेल्या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर लवकर पालिकेचा जेसीसी फिरणार आहे. पुणे- लिंक रोड वरून लोकग्रामकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला हा आरक्षित भूखंड आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालिकेच्या सर्व प्रभागातीत सहाय्यक आयुक्तांना पालिकेच्या शहर विकास आराखड्यातील सर्व आरक्षित भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार पुणे लिंक रोड जवळील प्रभाग ४ जे अंतर्गत असलेल्या आरक्षण भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटवण्या बाबतच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्याचे पालिका सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पूर्वेतील एका खासगी संस्थेने उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल केली होती. या याचिकेच्या निर्णयातही हा भूखंड रिकामा करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले असल्याचे बोलले जात आहे. परंतु या भूखंडाची जागा ही महापालिकेकडे अद्यापही  हस्तांतरीत झाली नसल्याने महापालिकेला भूखंडाची जागा अधिकृतपणे ताब्यात घेता येत नाही. तरीही या भूखंडावरील असलेली अतिक्रमणे हटवली जाणार आहेत.

या आरक्षित भूखंडावरील अनधिकृत बांधकाम धारकांना नियमांप्रमाणे नोटीस दिली होती.  त्या अनुषंगाने  ७ जानेवारी २०२२ रोजी सुनावणी घेण्यात आली असता संबंधीत अनधिकृत बांधकाम धारकांनी मालमत्ता काढून घेण्यासाठी ८ दिवसांची मुदत मागितली होती. त्या मुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांना ८ दिवसांची मुदत दिली असून त्या नंतर या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे निष्कासित करण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात येईल.
– हेमा मुंबरकर, सहा. आयुक्त, प्रभाग ४ जे, कल्याण डोंबिवली महापालिका
First Published on: January 10, 2022 4:30 PM
Exit mobile version