केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची लोकनेतेपदाकडे वाटचाल

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची लोकनेतेपदाकडे वाटचाल

सातत्याने लोकांमध्ये राहणारा आणि लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. जलजीवन मिशनबरोबरच केंद्र सरकारच्या सर्व योजना त्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात योग्य पद्धतीने राबविल्या. मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे, ही तळमळ घेऊन ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना लोकांचे प्रेम मिळत आहे. त्यांची वाटचाल ही नेतेपदापासून लोकनेतेपदाकडे सुरू आहे. लोकनेता कोणालाही स्वत:हून होता येत नाही, कारण जनता लोकनेता ठरवित असते, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे काढले.

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने भिवंडी लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या कपिलोत्सव कार्यक्रमाचा समारोप दिवेअंजुर येथे केंद्रीय राज्यमंत्री पंचायतराज चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याने झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार गीता जैन, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, सुनील भुसारा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, रविंद्र फाटक, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील, सिद्धेश पाटील, भाजपाचे नेते दशरथ तिवरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, प्रेमनाथ म्हात्रे, वरुण पाटील, तरुण राठी आदी उपस्थित होते.

या वेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रिकेट मैदानावर जाऊन जोरदार बॅटिंग केली. त्यांना कपिल पाटील यांनी बॉलिंग केली. या वेळी दोन फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. फडणवीस म्हणाले, दुर्गम आदिवासी भागात सुविधा पोचविण्याचे काम कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने केले जाते. त्याचप्रमाणे ‘खेळ महोत्सव’च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना चांगला मंच उपलब्ध करून देतात. भिवंडी लोकसभा मतदारसंघासह कल्याण पश्चिम भागात कपिल पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली. उड्डाण पूल, नदी, खाडीवरील पूल, काँक्रीट रस्ते आदींसाठी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.’’ नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी सर्वप्रथम मागणी लोकसभेत २०१६ मध्ये कपिल पाटील यांनी केली होती, असेही फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.

First Published on: March 7, 2023 10:39 PM
Exit mobile version