तानसा अभयारण्यातील गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर

तानसा अभयारण्यातील गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर

तानसा अभयारण्यात गिधाड जातीच्या  पक्षांची संख्या दिवसागणिक कमी होत चालली असून यामुळे पक्षी प्रेमी मध्ये नाराजी पसरली आहे. एरव्ही डोंगर कपाऱ्या मध्ये राहणारा हा पक्षी थंडीच्या मोसमात  पर्यटकांना दृष्टीस पडत असे. परंतु आता अभयारण्यात भटकंती करणाऱ्या पक्षी प्रेमींच्या नजरेस हा पक्षी फार कमी प्रमाणात दिसतो आहे. गिधाड हे नाव जरी घेतलं की डोळ्या समोर उभा राहतो तो उंच पुरा पक्षी, जो नेहमी थव्याने एकत्र आढळणारा. विशेष म्हणजे मृत जनावरांचा वास जरी आला तरी शेकडो गिधाड पक्षी एकत्र येऊन तो मृत प्राणी फस्त करणार. पिसे नसलेले केसरहित डोके हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्ट्य आहे.

गिधाडे हे निसर्गातील सफाई कर्मचारी म्हणून ही ओळखले जातात. गिधाडे ही अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत.  तानसा अभयारण्यात  एकेकाळी गेल्या १५ ते २० वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती. परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे वास्तव समोर येत आहे. गिधाडांची संख्या इतकी कमी झाली आहे की आता गिधाडे नामशेष होणार की काय अशी भीती पक्षी निरीक्षकांना व पक्षीप्रेमींना वाटते आहे. गिधाडांची कोणी शिकार करत नाही. भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचे खाद्य कमीही झालेले नाही. त्यांच्या संख्येला मुख्य फटका बसला आहे ते औषधे आणि रसायनांमुळे.

 

पाळीव प्राण्यांना डायक्लोफिनॅक नावाचे औषध देतात. औषध घेतलेले असे मेलेले प्राणी खाल्यामुळे गिधाडांमध्ये ते औषध जाते. त्यामुळे गिधाडांच्या शरीरात अनेक व्याधी होतात आणि ती मरतात. गिधाडे सुंदर नाहीत आणि ते मृतदेह खात असल्याने सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना असते. परंतु निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे काम ते करत आहेत. गिधाडे नसतील तर मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका असतो. म्हणून गिधाडांना वाचवले गेले पाहिजे. भारतीय सरकारने प्राण्यांना देण्यात येणा-या या औषधांवर बंदी आणलेली आहे. आहे परंतु ते प्रत्यक्षात मात्र आलेली नाही.

First Published on: April 15, 2021 8:24 PM
Exit mobile version