राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, भास्कर जाधव स्पष्टच बोलले

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, भास्कर जाधव स्पष्टच बोलले

ठाणे – शिवसेनेत बंडाळी झाल्यापासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी साद घातली तर बघू असं सूचक विधान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला निश्चितच आनंद होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दिले. रविवारी दिवा येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कल्याण लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख सुभाष भोईर, कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, वैशाली दरेकर, कविता गावंड, माजी नगरसेविका अंकिता पाटील उपस्थित होते. (Will Raj and Uddhav Thackeray come together, Bhaskar Jadhav spoke clearly)

भास्कर जाधव म्हणाले की, “शर्मिलाताई ठाकरे काय बोलल्या हे मी ऐकले नाही. दुसरी गोष्ट कोणाच्या घरगुती विषयावर बोलणं हे आमच्यासारख्या माणसांना योग्य नाही. पण आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सर्व बाजूने घेरण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्यावेळेला त्यांच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा राहू पाहतोय. अशा वेळेला जर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक कुठल्याही प्रकारचा पूर्वीचा राग मनात न ठेवता याप्रसंगामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहिले, तर त्याचा निश्चितपणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आनंदच होईल.”

भास्कर जाधव यांनी यावेळी शिंदे गटावरही निशाणा साधला. “एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. काही मंडळी तर म्हणाली देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले म्हणून आम्हाला रडू कोसळले जे आजही थांबत नाहीये. जर त्यांचे सहकारी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान तर आहेच. पण एकनाथ शिंदे यांनीही विचार करण्याची गरज आहे,” असंही भास्कर जाधव म्हणाले.

तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवलात

“शिवसेना प्रमुखांचे नाव घेता, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जायचे म्हणून तुम्ही आम्हाला सांगता. दहीहंडी उत्सवात ठाण्यात शिंदे गटाने आपल्या बॅनरवर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे फोटो लावले होते. पण एकातरी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला होता का? धर्मवीर आनंद दिघे यांचा तरी फोटो होता का? याचा अर्थ भाजपाच्या पाठीमागे तुम्ही कशा पद्धतीने फरफटत गेलात आणि तुमचा स्वाभिमान तुम्ही गहाण ठेवला, हेच यावरुन दिसते, असा हल्लाबोलही जाधव यांनी यावेळी केला.

मंत्रिमंडळातील निर्णय भाजपच्या हिताचे

आताच्या मंत्रिमंडळाने घेतलेला एक तरी असा निर्णय दाखवावा, जो भाजपाला अपेक्षित नाही. सगळे निर्णय हे भाजपाच्या हिताचे घेतले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत होते,असे ते म्हणतात. त्यांनी तसं करायचे काही कारण नाही, ते तर आपल्या विरोधातच होते. पण जे आपल्यासोबत राहून शिवसेना संपविण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. गेले अनेक वर्षे सेनेसोबत राहून सेना संपविण्याचा एक कलमी कार्यक्रम ज्यांनी केला त्यांनी आज हे सरकार येऊन दीड महिना होत नाही तोच यांनी घेतलेले निर्णय बदलायला लावले, याचा अर्थ हे विरोधात होते. बरोबर राहून कसा धोका द्यायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे बदललेले निर्णय आहेत, अशी टीकासुद्धा जाधव यांनी केली.

First Published on: August 22, 2022 12:50 PM
Exit mobile version