ठाण्यातील स्मशानभूमीमधील कंत्राटी कामगारांना तडकाफडकी काढल्याने मनसेचे आंदोलन

ठाण्यातील स्मशानभूमीमधील कंत्राटी कामगारांना तडकाफडकी काढल्याने मनसेचे आंदोलन

कोरोनाच्या काळात स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या ६० तरुणांना ठेकेदाराने तडकाफडकी काढून टाकल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी जवाहर बाग येथील स्मशान भूमीमध्ये ठिय्या आंदोलन चालू केले आहे. जोपर्यंत मुलांना कामावर घेत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असा इशारा रविंद्र मोरे यांनी दिला आहे.

ठाण्यातील जव्हारबाग स्मशानभूमी मधील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार पल्लेव पष्ठे याने ६० तरुणांना तडकाफडकी काढून टाकले आहे. कंत्राटदाराने रात्री १० वाजता कामगारांना फोन केला आणि तुम्हाला कामावरुन काढून टाकले असे सांगितले. गेली सहा महिने कामगार स्मशानभूमीत काम करत आहेत. या सहा महिन्यात एकदाही वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही. राज्य शासनाने सांगितल्याप्रमाणे ३०० रुपये भत्ता देखील दिला नाही, असे कामगारांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यातील जवाहर बाग येथील स्मशान भूमीमध्ये ठिय्या आंदोलन चालू केले आहे. जोपर्यंत या ६० मुलांना कामावर घेत नाही. तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कोरोना रुग्णाची बॉडी याठिकाणी अंत्यविधीसाठी आत मध्ये घेऊन जाऊ देणार नाही, असे मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.

 

First Published on: November 21, 2020 2:56 PM
Exit mobile version