पावसामुळे शेती नुकसानीच्या पंचनाम्यात अडथळे!

पावसामुळे शेती नुकसानीच्या पंचनाम्यात अडथळे!

प्रातिनिधीक फोटो

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असले तरी, सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे पंचनामे करतांना अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील अधिकार्‍यांनी आतापर्यंत १ हजार २०० गावांमधील २६ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण केले असून नुकसानीची व्याप्ती बघता पुढील ७ ते ८ दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

नद्यांना पूर आल्याने पंचनाम्यात अडथळा

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने कहर केला असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळीने जिल्ह्यातील ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. निवडणुकीनंतर प्रशासकीय यंत्रणा पंचनाम्याच्या कामाला जुंपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधत पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे शेतांमध्ये पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच जिल्ह्यातील काही गावांमध्ये नद्यांना पूर आल्याने गावांमध्ये पाणी शिरल्याने पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत.

हेही वाचा – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने १० हजार कोटींची मदत करणार – देवेंद्र फडणवीस

७ ते ८ दिवसात पंचनामा पूर्ण करणार

अवकाळीने सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा या जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्यांना चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यात यावर्षी लागवडीखालील ७.४० लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३.२६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात द्राक्ष आणि मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बाजरी पिकाचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. ७३ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकाचेही नुकसान झाले आहे. प्रशासनातर्फे आतपर्यंत २६ हजार ८४७ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. यात १८ हजार ३५४ जिरायती, ३ हजार ५२९ हेक्टरवरील बागायत आणि ५ हजार ४३ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अद्याप पंचनाम्याचे काम सुरू असून नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. साधारणपणे ७ ते ८ दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.

१ लाख शेतकरी बाधित

जिल्ह्यातील १२०० गावांतील १ लाख ५ हजार ११५ शेतकरी बाधित झाले आहेत. यामध्ये नाशिक – १२६६, इगतपुरी – २८४४, त्र्यंबकेश्वर – २३५, कळवण – १२३१, सुरगाणा – १०१५, बागलाण – २९७५, चांदवड – २३७८, देवळा – २५७४, मालेगाव – ४३३४०, येवला – १७०४, नांदगाव – ३७५१३, निफाड : ५७३०, सिन्नर – २३०४ शेतकरी बाधित झाले आहेत.

First Published on: November 2, 2019 4:01 PM
Exit mobile version