केडीएमसीत भाजपचे महापौरपदाचे स्वप्न भंगणार

केडीएमसीत भाजपचे महापौरपदाचे स्वप्न भंगणार

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने, कल्याण डोंबिवली महापालिकेतही त्याचे पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे महापौरपद आणि स्टॅन्डींग सभापतीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युतीच्या वाटणीप्रमाणे शेवटचे महापौरपद हे भाजपच्या वाट्याला होते. मात्र नव्या समीकरणांमुळे भाजपचे महापौरपदाचे स्वप्न भंगणार असल्याचेच दिसून येतय.

केडीएमसीत शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे. २०१५ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या सत्तेची वाटणी झाली आहे त्यानुसार चार वर्षे महापौरपद हे शिवसेनेकडे तर शेवटचे वर्षे भाजपला देण्याचे ठरले होते. सध्या महापौरपद हे शिवसेनेकडे तर उपमहापौरपद हे भाजपकडे आहे. तसेच स्थायी समितीचे सभापतीपदाचीही वाटणी करण्यात आली होती त्यानुसार भाजपलाही स्थायी समितीचे सभापतीपद देण्यात आले होते.

नव्या समीकरणांचा भाजपला फटका सहन करावा लागणार

राज्यात नव्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेना आणि भाजप युतीत दरार निर्माण झाला आहे. मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत नवी समीकरणांची जुळवाजुळव दिसून आली. त्यामुळे त्याचे पडसाद आता केडीएमसीत उमटू लागले आहे. त्यामुळे शिवसेना महापौरपद सोडण्यास तयार नाहीत. स्थायी समितीच्या निवृत्त आठ सदस्यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. मात्र स्थायी समितीत शिवसेनेचे वर्चस्व असल्याने त्यामुळे शिवसेनेचाच सभापती होणार आहे. सध्या महापालिकेत शिवसेना ५२, भाजप ४२, राष्ट्रवादी काँग्रेस २, काँग्रेस ४, मनसे ९, अपक्ष ११, बसपा १, एमआयएम १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्यामुळे नव्या समीकरणांचा केडीएमसीतही भाजपला त्याचा फटका सहन करावा लागणार आहे.


हेही वाचा – आक्रमक होण्यापूर्वीच भाजपचे नगरसेवक दिशाहिन


 

First Published on: December 2, 2019 10:36 PM
Exit mobile version