घरमुंबईआक्रमक होण्यापूर्वीच भाजपचे नगरसेवक दिशाहिन

आक्रमक होण्यापूर्वीच भाजपचे नगरसेवक दिशाहिन

Subscribe

शिवसेना - भाजप काडीमोडानंतरही भाजपचे महापालिकेतील नगरसेवक आक्रमक झालेले पहाायला मिळत नसून महापालिका गटनेत्यांच्या आदेशाअभावी नगरसेवक दिशाहिन झालेले आहेत.

शिवसेना- भाजपची युती तुटून संसारात काडीमोड घेतल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक आक्रमक होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु या काडीमोडानंतरही भाजपचे महापालिकेतील नगरसेवक आक्रमक झालेले पहाायला मिळत नाहीत. महापालिका गटनेत्यांच्या आदेशाअभावी नगरसेवक दिशाहिन झालेले आहेत. त्यामुळे आक्रमक व्हावे की पहारेकरी म्हणून मवाळ भूमिका घ्यावी या संभ्रमातच भाजपचे नगरसेवक पडलेले असून भाजपचे मुंबई अध्यक्ष या नगरसेवकांमधील संभ्रम कधी आणि कसा दूर करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी युती करणार्‍या शिवसेना-भाजपने निवडणुकीनंतर युती तोडत एकमेकांपासून काडीमोड घेतला. शिवसेनेने, भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्वादीचा हात पकडत राज्यात सत्ता स्थापन केली. २०१७च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तोडत स्वतंत्र निवडणूक लढवल्यानंतरही महापालिकेत पहारेकरी बनत भाजपने पहारेकर्‍याची भूमिका बजावली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत ही युतीच संपुष्ठात आल्याने, मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेविरोधात आक्रमक होण्याचा पावित्रा भाजपने घेतला होता. मुंबई महापालिकेत भाजपचे सध्या ८३ नगरसेवक असून ते आता आक्रमक होत शिवसेनेला कोंडीत पकडतील, असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात शिवसेनेशी घेतलेल्या काडीमोडनंतर,भाजपचे नगरसेवक काही आक्रमक होताना दिसत नाही.

- Advertisement -

गटनेत्यांअभावी पक्षाच्या भूमिकेबाबतच नगरसेवकांमध्ये संभ्रम

भाजपचे महापालिका गटनेते मनोज कोटक हे खासदार बनल्यानंतर, त्यांच्या वारसदार अद्यापही नेमलेला नाही. कोटक यांनी आपल्याकडेच गटनेता पद ठेवल्यामुळे तसेच पक्षाने कोटक यांच्याऐवजी अन्य नगरसेवकावर गटनेतापद न सोपवल्यामुळे भाजपचे नगरसेवक दिशाहिन झालेले आहे. खासदार कोटक उपस्थित राहत नसल्याने तसेच भाजपच्या नगरसेवकांना योग्य मार्गदर्शन होत नसल्याने सभागृहात आणि समित्यांच्या बैठकीत पक्षाची नेमकी भूमिका काय मांडावी हेच आता नगरसेवकांना समजत नाही. त्यामुळे मागील दोन सभागृहांमध्ये तसेच समित्यांच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक आक्रमक होताना दिसले नाही. भाजपमधील बहुतांशी नगरसेवकांमध्ये अभ्यासवृत्ती असल्याने, प्रत्येक विषयांवर बोलण्यासाठी ते पारंगत आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयावर अधिनियमांच्या आधारे शिवसेनेला कोंडीत पकडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. परंतु, सध्या योग्य मार्गदर्शन करणारा नेताच नसल्याने नक्की काय भूमिका मांडावी, हाच प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. काही नवीन नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवकांचे मार्गदर्शन घेवून सभागृहात बोलण्याची इच्छा प्रकट करताना दिसतात. परंतु त्यांनाही काही ज्येष्ठ नगरसेवक योग्यप्रकारे मार्गदर्शन करताना दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची आक्रमकता कधी दिसेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे अद्यापही गटनेता बदलण्याबाबत कोणतीही भूमिका घेत नाही. तसेच पक्षाची भूमिका कोणती मांडावी याबाबतचे आदेश देत नाही. त्यामुळे एका बाजुला गटनेता नाही आणि दुसर्‍या बाजुला मुंबई अध्यक्षही भूमिका घेत नसल्याने भाजप नगरसेवकांनी कोंडीच झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेशी दोन हात करण्यापूर्वी त्यांना शस्त्र मॅन करुन ठेवावी लागत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘माजी नगरसेवकांचे पालकत्व महापालिकेने घ्यावे’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -