मी निवडणूक लढवणार; आदित्य ठाकरेंचा एल्गार!

मी निवडणूक लढवणार; आदित्य ठाकरेंचा एल्गार!

आदित्य ठाकरे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज, सोमवारी वरळी येथे होत असलेल्या विजय संकल्प मेळाव्यात यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मी निवडणूक लढवणार, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी आपल्या सक्रिय राजकारणातून संसदीय राजकारणात प्रवेश करत असल्याचे अधिकृतरित्या सांगितले. या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात उतरली असून वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे.

या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत, नीलम गोऱ्हे, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आदी. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

काय म्हणाले आदित्य ठाकरे

हा उत्साह नुसता इथे नाही तर महाराष्ट्राच्या गल्लीत दिसला पाहिजे. हा मेळावा असताना एवढे प्रेमाचे लोक का आले यांचा प्रश्न पडला आहे. गेले २ ते ३ महिने आम्ही जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गावागावात फिरलो. त्यावेळी नवीन मने जिंकत होतो. जेव्हा जेव्हा माझा ताफा एका ठिकाणाहून दुसरीकडे निघायचा तेव्हा प्रत्येक जण मला निवेदन देत होते. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जे प्रेम मिळत होते. तेच मला मिळालं. मला राजकारणाची आवड होती. मी राजकारणाशिवाय इतर काहीच करू शकत नाही. हे मी माझ्या मित्रांना सांगत असे. आपण राजकारण म्हणजे समाजकारण म्हणून पाहिले आहे. या देशात जर नवं काही तरी घडवायचे असेल तर राजकारण हे एकमेव माध्यम आहे. आपल्याला वरळीप्रमाणे महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. जरी वरळी हा माझा मतदारसंघ असला तरी महाराष्ट्र्र ही आपली कर्मभूमी आहे. आपल्या समोर कुणीही उभं राहील त्याला लढू द्या, आपण आपलं काम करू. आज मी आईला सांगितले की, मागे बस कारण आई असली की मला काय बोलावं हे सुचत नाही. मी माझ्या स्वप्नांसाठी सत्तेच्या मागे पळत नाही. तर जनतेच्या स्वप्नांसाठी पळत होतो. हो हीच ती वेळ आहे, शिवसेनेला सगळीकडे घेऊन जायची, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा –

ठरलं, मनसे निवडणूक लढवणार! राज ठाकरेंनी केली पहिल्या उमेदवाराची घोषणा

First Published on: September 30, 2019 5:41 PM
Exit mobile version