अजित पवार सगळं सांगतील; चिंतेचं कारण नाही – शरद पवार

अनेक तासांपासून अदृश्य असलेले अजित पवार अखेर शनिवारी दुपारी १२च्या सुमारास शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रकट झाले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याआधीच शरद पवार सकाळी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. तिथेच सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार देखील उपस्थित होते. यावेळी फक्त पवार कुटुंबीय सोडून कुणीही राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता सिल्व्हर ओकमध्ये उपस्थित नव्हता. यावेळी पवार कुटुंबीयांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर आधी अजित पवार आणि नंतर शरद पवार सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले. ‘पत्रकार परिषदेमध्ये मी सगळी भूमिका स्पष्ट करेन’, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. मात्र, शरद पवार यांनी यावेळी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. ‘जे काही असेल, ते सगळं अजित पवार पत्रकार परिषदेत सांगतीलच. मी फक्त इतकंच सांगेन की चिंतेचं काहीही कारण नाही’, असं शरद पवार म्हणाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सुटकेता नि:श्वास सोडला.


हेही वाचा – अजित पवारांनी डिप्रेशनमध्ये दिला राजीनामा, जितेंद्र आव्हाडांचं धक्कादायक विधान

शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. शरद पवारांच्या ईडी भेटीचं नाट्य नुकतंच संपलेलं असताना अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे वेगवेगळे तर्क लढवले जात होते. त्यातच राजीनामा देण्याआधी किंवा नंतरही माझी अजित पवारांशी चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिल्यामुळे त्यावरून चर्चा सुरू झाली होती. रात्रभर अजित पवारांचा फोन स्वीच ऑफ येत होता. शनिवारी सकाळी मात्र अजित पवारांनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केली आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार यांच्यासमवेत अजित पवार यांची सुमारे दीड तास चर्चा झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले.

First Published on: September 28, 2019 3:37 PM
Exit mobile version