राजीनाम्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत अजित पवार रडले!

राजीनाम्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत अजित पवार रडले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव ईडीच्या चार्जशीटमध्ये आल्यामुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचं अखेर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीर केलं. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला. शरद पवारांची ईडी भेट रद्द झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास अजित पवारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले होते. अखेर शनिवारी सकाळी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

छगन भुजबळांनी घातली अजित पवारांची समजूत

दरम्यान, पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू मांडताना अजित पवारांना अश्रू अनावर झाले. शिखर बँकेत झालेल्या आकड्यांमध्ये व्यावहारिकताच नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ‘मागेही ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तेव्हा देखील मी अस्वस्थ झालो होतो. या प्रकरणात देखील ५ वर्षांपासून चौकशी सुरू होती. अजूनही ती संपत नाही. आता म्हणतात २५ हजार कोटींचा घोटाळा. लोकांना वाटेल की अजित पवारला हजार कोटींशिवाय दुसरं काही सुचतं की नाही? आम्हीही तुमच्यासारखीच माणसं आहोत. आम्हालाही भावना आहेत की नाही?’ असं अजित पवार म्हणाले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. यावेळी बोलता बोलता अजित पवार थांबले आणि त्यांनी ‘हे योग्य नाही’ इतकंच सांगितलं. त्यानंतर त्यांच्या बाजूलाच बसलेल्या छगन भुजबळ यांनी त्यांचं सांत्वन करत ‘बरोबर झालं, परिषद चांगली झालीय’, असं सांगत त्यांची समजूत काढली.


सविस्तर वाचा – काय म्हणाले अजित पवार पत्रकार परिषदेत

दरम्यान, ‘संचालक मंडळावर माझं नाव होतं, पण शरद पवारांचं अद्याप कुठेही आणि कोणत्याही संचालक मंडळावर नाव नसतानाही त्यांचं नाव बँक घोटाळा प्रकरणात गोवलं गेलं आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला’, असा दावा देखील अजित पवार यांनी यावेळी केला.

First Published on: September 28, 2019 4:33 PM
Exit mobile version