चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सर्व विरोधकांची ‘मनसे फिल्डिंग’

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सर्व विरोधकांची ‘मनसे फिल्डिंग’

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदेंचे आव्हान

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. लोकांमधून निवडून आलेले नसल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना नेहमीच हेटाळणीला सामोरे जावे लागत होते. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित असलेला कोथरुड मतदारसंघ सोडण्यात आला आहे. मात्र ब्राह्मणेतर आणि पुण्याबाहेरील असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना विरोध होत आहे. हा विरोध एकत्र करुन पाटील यांना शह देण्यासाठी आता सर्व विरोधकांनी मनसेच्या उमदेवाराला पाठिंबा देत चागंलीच फिल्डिंग लावली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि मुळशी सुपुत्र मुरलीधर मोहोळ यांना डावलले गेल्याने मुळशी तालुक्यातील येथे स्थायिक झालेला मतदार दुखावला गेला आहे. या पार्श्वभुमीवर ब्राह्मण समाज ही नाराज झाला आहे. काँग्रेस आघाडीने जागा वाटपात हा मतदारसंघ मित्र पक्षाकरीता सोडला होता. मनसेकडून शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली, तर काँग्रेस आघाडीच्या मित्रपक्षाकडून तुल्यबळ उमेदवार येत नसल्याने आघाडीने शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे पाटील विरुद्ध शिंदे अशी थेट लढत होणार आहे. नाराज असलेल्या शिवसैनिकांकडूनही शिंदे यांना मदत मिळू शकते.

दरम्यान शुक्रवारी शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेस आघाडीतर्फे अंकुश काकडे यांनी शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला.

First Published on: October 4, 2019 4:45 PM
Exit mobile version