शपथविधीपर्यंत पवार कुठल्या बाजूला जातील माहीत नाही – बच्चू कडू

शपथविधीपर्यंत पवार कुठल्या बाजूला जातील माहीत नाही – बच्चू कडू

बच्चू कडू म्हणतात, 'शरद पवार शेवटपर्यंत कुठेही जाऊ शकतात'

एकीकडे आज मुंबईत बैठकांचं सत्र सुरू असून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला असतानाच आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बच्चू कडू म्हणाले, ‘इथे सगळ्यांच्या मनात शरद पवारांबद्दल भिती आहे. जोपर्यंत शपथविधी होत नाही, तोपर्यंत आपण काहीही सांगू शकत नाही. शरद पवार शेवटपर्यंत कुठेही जाऊ शकतील.’ त्यासोबतच, ‘शरद पवार काय करतात, हे खुद्द अजित पवारांना समजलं नाही, ते मला काय कळणार’, असं म्हणत बच्चू कडूंनी टोला हाणला!

‘राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायची इच्छा नव्हती’

दरम्यान, यावेळी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकासआघाडीला पाठिंबा देण्याबद्दल बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली. ‘माझी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी हेच गृहीत धरलं होतं की भाजप-शिवसेनेचं सरकार येईल आणि त्यामुळेच पाठिंबा दिला होता. पण कालांतरानं राजकारण बदलत गेलं. आणि राजकारणानुसार धोरण बदललं. जे होतं, ते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच होतं असं समजू आपण. माझे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध होते. पण मी उद्धव ठाकरेंना शब्द दिला होता. शब्दाच्या पुढे काहीही नसतं. भाजपकडून पाठिंब्यासाठी पुन्हा प्रयत्न झाला होता. पण मी मातोश्रीला शब्द दिला होता’, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.


हेही वाचा – ‘उद्धव ठाकरे जनतेच्या इच्छेला मान देतील’, मुख्यमंत्रीपदावर संजय राऊतांचं विधान!

‘कोण मुख्यमंत्री होणार? यापेक्षा कुणासाठी मुख्यमंत्री होणार? हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. राज्यातल्या बजेटमध्ये कष्टकरी माणूस आला पाहिजे. उद्धवजी मुख्यमंत्री झाले, तर त्यांच्याकडून देखील त्याच अपेक्षा असणार’, असं देखील बच्चू कडू यावेळी म्हणाले.

First Published on: November 22, 2019 12:25 PM
Exit mobile version